• Mon. Nov 25th, 2024

    बॅंकिंग सेवा तळागाळापर्यंत पोहचवणे हा विविध योजनांचा उद्देश- केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड

    ByMH LIVE NEWS

    Apr 24, 2023
    बॅंकिंग सेवा तळागाळापर्यंत पोहचवणे हा विविध योजनांचा उद्देश- केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड

    सातारा दि. २४ : केंद्र शासनाने बँकिंग क्षेत्राशी निगडीत योजना सुरू केल्या आहेत. बॅंकिंग सेवा तळागाळापर्यंत पोहचवणे हा या विविध योजनांचा उद्देश असल्याचे प्रतिपादन केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड यांनी केले.

    सातारा येथील फर्म रेसिडेन्सी येथे पश्चिम महाराष्ट्रातील बँकिंग क्षेत्राबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्री. कराड बोलत होते. यावेळी साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील, सोलापूरचे खासदार जयसिद्देश्वर महास्वामी, आमदार जयकुमार गोरे, नाबार्डचे महाव्यवस्थापक प्रदीप परांदे, पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचे लीड बँक मॅनेजर व बँक प्रतिनिधी उपस्थित होते.

    आर्थिक साक्षरता महत्त्वाची असल्याचे सांगून केंद्रीय वित्त राज्यमंत्री श्री. कराड म्हणाले, लोकांना आर्थिक साक्षर करणे ही बँकांची जबाबदारी आहे. तसेच आर्थिक शिक्षणासोबतच डिजीटल व्यवहारांची माहितीही जनतेपर्यंत पोहचवावी. उद्योग, व्यापार करू इच्छिणाऱ्या प्रत्येकास कर्ज उपलब्ध करून द्यावे. त्यासाठी शासनाने मुद्रा, स्वनिधी यासारख्या योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा लाभ जास्तीतजास्त पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचवणे ही सुद्धा बँकांची जबाबदारी आहे. रोजगार निर्मितीसाठी मुद्रा योजना ही महत्त्वाची आहे. तसेच कृषि क्षेत्रासाठी चांगल्या प्रमाणात  वित्त पुरवठा करणेही गरजेचे असल्याचे ते यावेळी म्हणाले.

    यावेळी केंद्रीय वित्त राज्यमंत्री श्री. कराड यांनी प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, मुद्रा योजना, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, कृषि कर्ज पुरवठा, पशु संवर्धन व मत्स्य व्यवसायासाठीचा अर्थ पुरवठा यांचा आढावा घेतला.
    00000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *