आज पुण्यात चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली भाजपची महाबैठक पार पडली आहे. या बैठकीत पुण्यातील भाजपचे सर्वच पदाधिकारी उपस्थित होते. या पदाधिकाऱ्यांना बावनकुळे यांनी महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्यातील महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात होणार आहेत. स्वतः देवेंद्र फडणवीस पुण्यात जातीने लक्ष घालणार आहेत. त्यामुळे पुणे महापालिकेत 100 पेक्षा अधिक नगरसेवक निवडणून आणण्याचे लक्ष ठेवण्याचे आदेश चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. तर पक्षाची संघटनात्मक ताकद कशी वाढेल यावर प्रत्येक कार्यकर्त्याने लक्ष देण्याच्या सूचना देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी या बैठकीत दिल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. 9 मे नंतर न्यायालय उन्हाळी सुट्टीवर जाणार आहे, त्यामुळे 9 मे पुर्वी न्यायालयाने निकाल दिला तरच ऑक्टोबरमध्ये निवडणुक होण्याची शक्यता आहे. असं विधान नुकतेच पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यानंतर आज पुन्हा भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनेच तीच तारीख दिल्याने लवकरच महापालिका निवडणूक लागण्याची शक्यता आहे.
मुंबई, पुणे, ठाणे, औरंगाबादसह राज्यातील अनेक महानगरपालिकांची मुदत उलटून गेल्यामुळे त्या विसर्जित झाल्या आहेत. त्यामुळे या महानगरपालिकांचा कारभार प्रशासकांच्या माध्यमातून सुरु आहे. त्यामुळे राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका कधी होणार, हा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. त्यातच आज सत्ताधारी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षानेच आपल्या पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्याने राज्यात लवकरच निवडणुकांचा धुरळा उडण्याची शक्यता आहे.