• Sat. Sep 21st, 2024
ते जगाचे नेते, भाजपच्या पोपटांना पोपटपंची करु द्या; संजय राऊतांची राज ठाकरेंवर टीका

मुंबई:खारघर येथील महाराष्ट्र भूषण सोहळ्यातील दुर्घटना हा एक अपघात होता. त्यावरुन राजकारण करु नका. त्या अनुषंगाने महाराष्ट्रात करोना काळात हलगर्जीपणामुळे झालेल्या मृत्यूंसाठी देखील सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करता येऊ शकतो, असे राज ठाकरे यांनी म्हटले होते. त्यांच्या या टीकेचा रोख उद्धव ठाकरे यांच्या दिशे होता. या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर बोचऱ्या शब्दांत टीका करत त्यांना प्रत्युत्र दिले. संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर बोचऱ्या शब्दांत पलटवार केला.

Kharghar Tragedy: तहानेने जीव कासावीस, नळांमधून गरम पाणी; टँकरभोवती उसळलेल्या गर्दीने श्रीसेवकांचा जीव घुसमटला

संजय राऊत शुक्रवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, भाजपने एवढे पोपट पाळून ठेवले आहेत. त्यांना बोलू द्या, पोपटपंची करु द्या. नोटबंदी झाली तेव्हा पैसे काढण्याच्या रांगेत हजारो लोक मेले. हा सदोष मनुष्यवधच आहे. त्यावरही या पोपटांना बोलायला सांगा. करोना काळात गंगेत प्रेतं तरंगत होती. गुजरातमध्ये मृतदेह जाळण्यासाठी स्मशानात जागा नव्हती. मग गुजरातचे मुख्यमंत्री आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राज ठाकरे यांनी केली पाहिजे. ते जगाचे नेते आहेत. ते काय मागण्या करत आहेत, कोणासाठी करत आहेत? खारघर दुर्घटनेतील ढिसाळ नियोजन, लोक पाण्यासाठी तडफडत असताना मैदानात सुरु असलेल्या शाही मेजवानिविषयी राज ठाकरे यांनी बोलावे. उठसूट उद्धव ठाकरे यांच्यावर काय टीका करता? झोपेत, जागेपणी त्यांना उद्धव ठाकरे हेच दिसतात, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
खारघरच्या मैदानावर लाखो श्रीसेवक पाण्यावाचून तडफडत होते अन् शामियान्यात शाही मेजवानी सुरु होती: संजय राऊत

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?

करोनाच्या काळातही अनेक प्रकारचा हलगर्जीपणा झाला आहे. तिथेही अनेक प्रकरणांमध्ये आपल्याला सदोष मनुष्यवधाचा खटला आजही दाखल करता येऊ शकतो. याचं राजकारण करायला नको. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी सकाळची वेळ निवडायला नको होती. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना राजभवनात पुरस्कार देता आला असता. अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा पुरस्कार मिळाला आहे ही आनंदाची बाब आहे. मात्र जे घडलं तो अपघात आहे. अपघाताचं राजकारण कुणीही करू नये, असे राज ठाकरे यांनी म्हटले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed