अभयचीवाडी येथील रघुनाथ येडगे या शेतकऱ्याने दहा गुंठे क्षेत्रात वांग्याचे पीक घेतले होते. वांगी हे बारमाही उत्पन्न देणारे पीक असल्यामुळे उत्पादन खर्च वजा जाता चांगला नफा मिळेल, अशी येडगे यांना अपेक्षा होती. जानेवारी महिन्यात त्यांनी वांग्याच्या रोपांची लागवड केली. त्यावेळी वांग्याला प्रतिकिलो ४५ ते ५० रुपये दर होता. तो दर टिकून राहिला तर चांगला नफा मिळण्याची शक्यता होती. त्यामुळे रघुनाथ येडगे यांच्यासह त्यांचे कुटुंबीय जोमाने कामाला लागले.
रघुनाथ येडगे यांनी गत पंधरा दिवसांत सुमारे टनभर वांग्यांची विक्री केली. त्यांना २५ ते ३५ रुपयांपर्यंत दर मिळाला. त्यातून त्यांना सुमारे तीस हजार रुपये उत्पन्न मिळाले. मात्र, त्यांनी रोपे विकत घेण्यापासून उत्पादन निघेपर्यंत केलेला खर्च तीस हजारांपेक्षा जास्त आहे.
गत पंधरा दिवसांपूर्वी त्यांनी वांग्याचा पहिला तोडा केला. त्यावेळी दर प्रतिकिलो ३५ ते ४० रुपयांवर होता आणि आता अचानक दर चार रुपयांपर्यंत खाली आला. या दरातून वाहतूक खर्चही निघणे शक्य नसल्यामुळे हताश झालेल्या रघुनाथ येडगे यांनी शेतातील सुमारे टनभर वांगी काढून जनावरांसमोर टाकली तर झाडे कापून बांधावर टाकत त्यांना आग लावली.
एक किलो वांग्यांना एक रुपयाचा भाव, संतप्त शेतकऱ्यांनं २ क्विंटल वांगी बाजारातच फेकली
दर मिळेल, या अपेक्षेने आम्ही वांगी आणि मिरचीची लागवड केली होती. सुरुवातीला थोडेफार पैसे मिळाले. मात्र, अचानक दर कमी झाला. आता उत्पादन घेण्यात काहीच अर्थ नाही. वाहतूक खर्चही निघणार नाही. त्यामुळे मी वांग्याची झाडेच कापून काढली आहेत, असं रघुनाथ येडगे यांनी सांगितलं. अवकाळी पावसाच्या संकटाच्या सामना करणाऱ्या शेतकऱ्यापुढील बाजारपेठेतील दर घसरणीचं आव्हान संपताना दिसत नाही.