• Sun. Nov 17th, 2024

    डिजिटल तंत्रज्ञान सेवा पुरवठ्यातून अधिकाधिक रोजगार निर्मिती व्हावी- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Apr 13, 2023
    डिजिटल तंत्रज्ञान सेवा पुरवठ्यातून अधिकाधिक रोजगार निर्मिती व्हावी- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    नागपूर, दि.13 :  आजचे युग हे डिजिटल तंत्रज्ञानाचे आहे. डिजिटल हा परवलीचा शब्द झाला आहे. जग ज्या वेगाने पुढे जात आहे त्यात डिजिटल तंत्रज्ञानाची महत्त्वाची भूमिका असून डिजिटल तंत्रज्ञान सेवा पुरवठ्यातून अधिकाधिक रोजगार निर्मिती व्हावी, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

    मिहान सेझ मधील टेक महिंद्राच्या डिजिटल तंत्रज्ञानविषयक सेवा पुरविणा-या डिजिटल डिलिव्हरी सेंटरचे उदघाटन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.  टेक महिंद्राचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सी. पी. गुरनानी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

    डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्वांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल झाले आहेत. आज सर्वत्र वापरात असलेली युपीआय डिजिटल पेमेंट सिस्टीम हा या बदलाचा एक भाग आहे. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात या डिजिटल तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर होण्याची गरज आहे. तंत्रज्ञानामुळे ग्रामीण भागात संवादाचे जाळे विस्तारले आहे. डिजिटल डिलिव्हरी सेंटरच्या माध्यमातून सुमारे पंधराशे तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. डिजिटल तंत्रज्ञानविषयक सेवा पुरवठ्याच्या माध्यमातून ही संधी निर्माण झाली असल्याचे श्री. फडणवीस म्हणाले.

    केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, नागपूर हे शहर देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. देशातील विविध भागातील तरुण या ठिकाणी रोजगाराच्या शोधात येतात. या तरुणांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध होण्याची गरज आहे. यासाठी मिहान या महत्वाकांक्षी प्रकल्पांमध्ये एक लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य आहे. देशाची अर्थव्यस्था पुढे नेण्यासाठी रोजगार निर्मिती आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक टेक महिंद्राचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सी. पी. गुरनानी यांनी केले तर आभार राजेश चंद्रमणी यांनी मानले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *