मुंबई, दि. १३ : क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठीत शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी मागविण्यात आलेल्या प्रस्तावांचा प्राथमिक छाननी गुणांकन तक्ता प्रकाशित करण्यात आलेला आहे. या प्राथमिक छाननी गुणांकन तक्त्यातील माहितीसंदर्भात आक्षेप अथवा हरकती असल्यास १५ एप्रिल २०२३ पर्यंत क्रीडा व युवक सेवा संचालनालयाला कळविण्याचे आवाहन मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने केले आहे.
राज्य शासनाच्या क्रीडा विभागामार्फत राज्यातील उत्कृष्ट खेळाडूंना प्रतिष्ठेचा असलेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यात क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यासाठी राज्य शासनामार्फत “शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ठ क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार”, “शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू)” “शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार” “शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू)” असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराकरिता प्राप्त झालेल्या प्रस्तावांचा प्राथमिक छाननी केलेला गुणांकन तक्ता एकुण गुणांकनासह क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर “पुरस्कार” या टॅबमध्ये प्रकाशित करण्यात आलेला आहे.
प्राथमिक छाननी गुणांकन तक्त्यानुसार नमूद केलेल्या माहितीसंदर्भात आक्षेप अथवा हरकती असल्यास त्या दि. १३ ते १५ एप्रिल २०२३ या कालावधीमध्ये संचालनालयाच्या desk14.[email protected] या ई मेल आयडीवर विहीत नमुन्यात कळविण्यात यावेत. याबाबतचा विहीत नमुना संचालनालयाच्या https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील “ताज्या बातम्या” या टॅब मध्ये प्रकाशित करण्यात आलेला आहे.
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी मागविण्यात आलेल्या हरकती अथवा आक्षेपांचे निराकरण / स्पष्टीकरण दि. १५ ते १७ एप्रिल २०२३ या कालावधीमध्ये संचालनालयाच्या संकेतस्थळावर “पुरस्कार” या टॅबमध्ये प्रसिध्द करण्यात येईल.
क्रीडा संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणारा अहवाल हा प्राथमिक छाननी अहवाल असून, तो अंतिम नाही, असे मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
०००
पवन राठोड/ससं