मुंबई, दि. 13 :- राज्यातील जनतेला सर्व सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत. राज्याचा विकास झाला पाहिजे. यासाठी लोकहिताचे निर्णय घेऊन राज्याचा विकास करण्याचा प्रयत्न करीत असल्याची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुलाखतीत मांडली.
इंडिया टुडे समूहाच्या ‘मुंबई तक’ या ऑनलाईन वृत्तवाहिनीद्वारे आयोजित मुलाखतीत मुख्यमंत्री श्री.शिंदे बोलत होते. इंडिया टुडे समूहाचे सल्लागार संपादक राजदीप सरदेसाई आणि व्यवस्थापकीय संपादक साहिल जोशी यांनी घेतलेल्या या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सविस्तर भूमिका मांडली.
यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, सर्वसामान्यांना न्याय मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांना सहकार्य केले पाहिजे. चाळी आणि धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या मुंबईकरांना हक्काचे घर मिळाले पाहिजे. मुंबईतील रस्ते, पायाभूत सुविधा, स्वच्छता, सौंदर्यीकरण आणि दळणवळण व्यवस्था अशी विकासाची कामे झाली पाहिजेत याच दृष्टीने राज्य शासन काम करीत आहे. राज्याला सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी, उद्योगवाढ, रोजगार निर्मिती यासोबत पायाभूत सुविधांची कामे राज्यात सुरु केली आहेत. मागील काळातील कोणतेही काम बंद केलेले नाहीत, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी स्पष्ट केले.
या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी राज्यात सुरु असलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची माहिती दिली. यात नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे मिसिंग लिंक, कोस्टल रोड, मुंबई-गोवा एक्सेस कंट्रोल रस्ता, मेट्रो प्रकल्प, बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत माहिती विशद केली.यासोबत महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन आहे. राज्याच्या विकासासाठी केंद्र सरकारचे पाठबळ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना आणि कौशल्य विकास योजनांच्या माध्यमातून राज्यातील युवकांना कौशल्याभिमुख करुन रोजगारक्षम करण्यात येत असल्याचे देखील मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.
०००००
पवन राठोड/ससं/