• Sun. Sep 22nd, 2024

मराठी भाषेचे सर्वंकष धोरण लवकरच – मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर

ByMH LIVE NEWS

Apr 12, 2023
मराठी भाषेचे सर्वंकष धोरण लवकरच – मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर

मुंबई, दि. 12 : मराठी भाषेचे संवर्धन व्हावे, भाषेचा शिक्षण, शासकीय कामकाजात अधिकाधिक वापर व्हावा यासाठी मराठी भाषेचे सर्वंकष धोरण लवकरच जाहीर करणार असल्याची माहिती, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. मराठी भाषा धोरणाबाबत चर्चा करण्यासाठी भाषा सल्लागार समितीची बैठक आज मुंबईत आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस मराठी भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ.लक्ष्मीकांत देशमुख, सदस्य सयाजी शिंदे, अनंत देशपांडे, डॉ.प्रकाश परब, डॉ.पृथ्वीराज तौर, पी.विठ्ठल, प्रकाश होळकर, जयंत येलुलकर, डॉ.राजीव यशवंते, डॉ.वंदना महाजन, डॉ.अनुपमा उजागरे, श्रीमती जयश्री देसाई आदी सदस्य तसेच भाषा संचालक श्रीमती विजया डोणीकर, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सचिव डॉ.शामकांत देवरे आदी, तर श्रीपाद जोशी, डॉ.गणेश चंदनशिवे, पं.विद्यासागर, मिलिंद जोशी, रमेश वरखेडे, श्रीमती अनुराधा मोहनी आदी सदस्य ऑनलाईन उपस्थित होते.

मराठी भाषा धोरण तयार करण्यासाठी नेमलेल्या समितीने काही सूचना शासनासमोर सादर केल्या आहेत. या सूचनांवर सकारात्मक विचार करण्यात येऊन ज्या सूचनांवर तातडीने कार्यवाही करणे शक्य आहे, असे निर्णय तत्काळ घेतले जातील. तसेच दीर्घकालीन नियोजनही केले जाईल, असे मंत्री श्री.केसरकर यांनी सांगितले. मराठी भाषेसाठीचे धोरण अनेक वर्षे प्रलंबित होते. या धोरणाच्या माध्यमातून मराठीच्या विकासासाठी देशात आणि परदेशात कार्यरत असणाऱ्या मंडळांना प्रोत्साहन देण्यात येईल, असेही ते म्हणाले.

यावेळी प्रस्तावित मराठी भाषा भवनाचे सादरीकरण करण्यात आले. यात साहित्यिकांसाठी असलेल्या सुविधांचे समिती सदस्यांनी स्वागत केले. वाई येथील प्रस्तावित मराठी विश्वकोष मंडळाची इमारत तसेच मराठी भाषा विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांविषयी या बैठकीत चर्चा करण्यात आली.

0000

अर्चना शंभरकर/वि.सं.अ.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed