• Sat. Sep 21st, 2024

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे भगूर येथील स्मारक स्फूर्तीस्थळ व्हावे – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

ByMH LIVE NEWS

Apr 12, 2023
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे भगूर येथील स्मारक स्फूर्तीस्थळ व्हावे – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. 12 : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे भगूर येथील स्मारक अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग करुन नव्या पिढीसाठी स्फूर्तीस्थळ व्हावे, यासाठी तत्काळ कार्यवाही सुरू करावी, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित आढावा बैठकीत मंत्री श्री. मुनगंटीवार बोलत होते. बैठकीला सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात, पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे, सावरकर स्मारक समितीचे अध्यक्ष रणजित सावरकर, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, निवेदक मंजिरी मराठे आदी उपस्थित होते.

“नाशिक जिल्ह्यातील भगूर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म झाला. “सावरकर वाडा” या घरात त्यांचे बालपण गेले. त्याच घरात भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा संकल्प त्यांनी केला. या वाड्याला राज्य शासनाच्या पुरातत्व विभागाने स्मारकाचा दर्जा दिला. हे स्मारक आणि या वाड्याच्या भिंती केवळ माती विटांच्या भिंती न राहता त्या वि. दा. सावरकर यांचा जाज्वल्य राष्ट्रभक्तीचा संदेश देणाऱ्या बोलक्या भिंती व्हाव्यात”, अशी अपेक्षा श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी संस्कारित स्वातंत्र्याचा विचार मांडला. २१ व्या शतकात तज्ज्ञ आणि तंत्रज्ञानाचा संपूर्ण उपयोग करुन स्वातंत्र्यवीर सावरकरांचा इतिहास नव्या पिढीला दाखवा. भगूर या गावात प्रवेश करताच विनायक दामोदर सावरकर यांचा जीवनपट समोर यावा अशा पद्धतीने काम व्हावे, अशा सूचनाही या बैठकीत दिल्या.

००००

वर्षा आंधळे/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed