• Thu. Nov 28th, 2024
    धनी आणि कारभारीण एकाचवेळी पोलीस दलात भरती, शिरुरमधील शेतकरी जोडप्याने करुन दाखवलं!

    शिरूर, पुणे:एकीकडे शेती शेती मालाला मिळत नसलेला भाव त्यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यात नेहमीच अश्रू पहायला मिळतात. कष्ट पाचवीला पुजलेल्या शेतकऱ्याच्या आयुष्यात नेहमीच समस्यांचे बांध असतात. मात्र, हे सर्व करत असताना शिरूर तालुक्यातील नवरा बायकोने पोलिस भरतीमध्ये जाण्याचा घेतलेला ध्यास. त्यांना कुटुंबानेही तितकीच मोलाची साथ दिली. या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नांचे अखेर चीज झाले आहे. कारण शेतात कांदा काढणी करत असताना शेवटची मेरिट लिस्ट लागली आणि नवरा बायको पोलिस भरतीसाठी निवड झाली. या आनंदात पतीने आपल्या पत्नीला उचलून घेऊन आपला पोलीस भरतीचा आनंद साजरा केला. यावेळी यांच्या आई वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू पहायला मिळाले.

    शिरूर तालुक्यातील चांडोह येथे राहणारे शेलार कुटुंब. म्हातरबा शेलार यांचा मुलगा तुषार आणि सून भाग्यश्री हे दोघेही पोलिसात भरती झाल्याने त्यांच्या कुटुंबात उत्साहाचे वातावरण पहायला मिळत आहे. या आनंदात पतीने पत्नीला उचलून घेऊन कांद्याच्या शेतात आनंद उत्सव साजरा केला. शेलार यांचे कुटूंब हे गावाच्या सामाजिक विकासासाठी झटणारे कुटुंब आहे. शेलार कुटुंबातील त्यांची आई कुसूम शेलार ही पाच वर्ष सरपंच म्हणून त्यांनी अनेक विविध विकास कामात मोलास सहकार्य केले आहे. रस्त्यापलीकडे असणाऱ्या गावाला वेगळी ओळख निर्माण करून देण्याचे काम त्यांनी केले.

    यवतमाळच्या शेतकरी पुत्रांची कंपनी ‘फोर्ब्स’च्या यादीत; उद्योजकता क्रमवारीत १०० गुणवंत कंपन्यांमध्ये निवड

    २०२० मध्ये तुषार आणि भाग्यश्री यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटात पार पडला. दोघांनीही फक्त पोलिसात भरती व्हायचे अशी शपथच घेतली होती. या दोघांनाही पोलिस भरतीचे वेध लागले होते. तुषार आणि भाग्य श्री यांनी गेल्या चार वर्षांपासून पोलिस भरतीसाठी लक्ष केंद्रित केले होते. दररोज व्यायाम, शेतात असणारे घर आणि शेतीतील काम हे नेहमीचेच होते. त्यांना हे सर्व करताना प्रचंड त्रास सहन करावा लागले. मात्र, त्याचे चीज झाल्याची भावना तुषार याने व्यक्त केली आहे.

    ‘साथ जियेंगे, साथ मरेंगे’, एचआयव्ही बाधित जोडपे अडकले विवाहबंधनात, जिल्हा प्रशासनानं केलं कन्यादान

    शिरूर तालुक्यातील जांबूत येथील पोलिस अकादमीतून या परिसरातील अनेक तरुण या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. असे असले तरी या जोडप्याला मिळालेल्या यशाचे महत्त्व आगळेवेगळेच आहे. त्यामुळे निकाल लागल्यावर पतीने या पत्नीला खांद्यावर उचलून घेऊन आनंद व्यक्त केला. याबाबत आपल्या भावना व्यक्त करताना भाग्यश्री शेलार यांनी सांगितले की, सासरी नांदायला आल्यावर सासूने मुलीप्रमाणे अन जाऊने बहिणीप्रमाणे वागणूक दिली. सासरे अन भावाने खुप सहकार्य केले. दररोजचा व्यायाम व अभ्यास या परीक्षेसाठी कामी आला. जिद्द अन चिकाटीच्या जोरावर हे यश मिळाले आहे. आई अन वडीलांच्या आशीर्वादाने पोलिस दलात भरती झाले.

    या घवघवीत यशानंतर तुषार यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, आई, वडील व भाऊ, वहिनीच्या आशीर्वादाने हे यश मिळाले आहे. गेल्या चार वर्षात चार वेळा या भरतीसाठी पळालो. अखेर यावर्षी हे यश मिळवता आले. यासाठी पत्नी भाग्यश्रीने मोलाची साथ दिली. त्यामुळेच आम्ही दोघेही पोलिस भरती झालो. भविष्यात शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरूद्ध लढेल. कोणावर अन्याय होऊ देणार नाही. पोलिस दलातील भरतीमुळे खऱ्या अर्थाने वैवाहिक जीवन सुरू झाले असल्याची भावना तुषारने यावेळी व्यक्त केली.

    पुणेकर ऐकत नाय! हापूस परवडेना म्हणून थेट आंबा EMIवर, विक्रेत्याची भन्नाट कल्पना

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed