• Sat. Sep 21st, 2024

मध्य प्रदेश, राजस्थानात आढळणारा दुर्मीळ ब्लॅक कोब्रा कल्याणमध्ये घरात सापडला; सगळेच चकित

मध्य प्रदेश, राजस्थानात आढळणारा दुर्मीळ ब्लॅक कोब्रा कल्याणमध्ये घरात सापडला; सगळेच चकित

कल्याण : बदलत्या हवामानामुळे भक्ष्याच्या शोधात राज्यात दुर्मीळ असलेला ब्लॅक कोब्रा कल्याणजवळच्या वडवली गावातील एका घरात घुसला. तर दुसरा इंडियन कोब्रा कल्याण पश्चिमेतील एका मंदिरात घुसल्याच्या घटना घडल्या आहेत. या दोन्ही घटनांमधील कोब्रा नागांना सर्पमित्रांनी शिताफीने पकडल्यानंतर रहिवाशांनी सुटकेचा निश्व:स सोडला.पहिल्या घटनेतील ब्लॅक कोब्रा कल्याणजवळच्या वडवली गावात राहणार्‍या दुर्गेश झा यांच्या घरात घुसल्याने घरातील झा कुटुंबाची भंबेरी उडाली. संपूर्ण कुटुंबाने जिवाच्या भीतीने घराबाहेर धूम ठोकली होती. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी वॉर फाउंडेशनच्या मदत क्रमांकावर संपर्क साधून घरात कोब्रा शिरल्याची माहिती दिली. माहिती मिळताच सर्पमित्र रोमेश यादव व प्रतीक पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन या ब्लॅक कोब्राला शिताफीने पकडले. पकडलेला साप कोब्रा जातीचा नाग असून तो मध्यप्रदेश आणि राजस्थान राज्यांत मोठ्या प्रमाणात आढळून येतो. मात्र, हा ब्लॅक कोब्रा कल्याणमध्ये आढळल्याने सर्पमित्रांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

black cobra snake

ब्लॅक कोब्रा

विशेष म्हणजे नागपंचमी आणि महाशिवरात्र हे सण महाराष्ट्रात मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जातात. या दोन्ही सणाच्या दिवशी या कोब्रा नागाचे खूप महत्त्व असते. या गोष्टीचा फायदा घेत मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, हरयाणा व इतर भागातून गारुडी नागाच्या विष ग्रंथी काढून किंवा तोंड शिवून अवैधरीत्या हे नाग महाराष्ट्रात घेऊन येतात. ठीक ठिकाणी खेळ दाखवून व धार्मिक गोष्टींचा आढावा घेऊन पैसे कमवतात. मात्र त्यामुळे हे कोब्रा नाग जास्त दिवस जगत नसल्याने पर राज्यातून आलेले गारुडी हे कोब्रा नाग येथेच सोडून जातात. हा कोब्रा नाग असाच गारूड्याने सोडलेला असल्याची माहिती वॉर फाउंडेशनचे प्राणीमित्र रोमेश यादव यांनी दिली. या कोब्रा नागाला पकडण्यासाठी अनुराग लोंडे, योगेश कांबळे, पार्थ पाठारे, मंदार सावंत, रेहान मोतीवाल यांनी शिताफीने पकडून या कोब्रा नागाला कल्याण वनविभागाच्या ताब्यात दिले. हा कोब्रा नाग साडेपाच फूट लांबीचा आहे.

शेतकऱ्यांनी अर्धा राज्य महामार्ग केला बंद! डोंबिवली बदलापूर पाइपलाइन रोडवरील वाहतुकीला फटका
दुसऱ्या घटनेतील इंडियन कोब्रा जातीचा नाग कल्याण पश्चिम भागात असलेल्या एका देवळात घुसला होता. या नागाला पाहून मंदिरातील भक्तांनी बाहेर धूम ठोकली. त्यानंतर मंदिरात नाग शिरल्याची माहिती सर्पमित्र दत्ता बोंबे यांना भक्तांनी दिली. माहिती मिळताच सर्पमित्र दत्ता बोंबे हे मंदिरात दाखल होऊन त्या इंडियन कोब्रा नागाला शिताफीने पकडले आणि पिशवीत बंद केले. नाग पकडल्याचे पाहून भक्तांनी सुटेकचा निश्वास घेतला.
बीअर घेण्यासाठी आला, दुकान मालकाचा ७० हजारांचा मोबाइल घेऊन पळाला; डोंबिवलीतील घटना
हा नाग इंडियन कोब्रा जातीचा असून साडेतीन फूट लांब आहे. या कोब्रा नागाला कल्याण वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या परवानगीने निर्सगाच्या सानिध्यात सोडून दिल्याची माहिती सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी दिली. बदलत्या हवामानामुळे विषारी-बिनविषारी साप मानवी वस्तीत भक्ष्याच्या शोधात शिरत आहेत. त्यामुळे मानवी वस्तीत साप दिसल्यास तातडीने सर्पमित्रांशी संपर्क साधावा, असे आवाहन सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed