जालन्यावरुन जिंतूर कडे दुचाकी क्रमांक एम एच २० एफ सी ५१५४ या गाडीवरुन दोघे प्रवास करत होते. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील चारठाणा गावाजवळील पुलावर आली असताना भरधाव वेगामुळं चालकाचे दुचाकी वरील नियंत्रण सुटले. यानंतर दुचाकी फुलावरून खाली कोसळली होती. या अपघातामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले. या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी जखमींना उपचारासाठी पोलीस प्रशासनाच्या मदतीने जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले.
दुचाकी पुलावरून खाली कोसळल्यामुळे अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या दोघाजणांचा जिंतूर ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच चारठाणा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. पुलावरून खाली कोसळून मृत्यू झालेल्या दोन्ही व्यक्तींची ओळख पटवण्याचे काम पोलीस प्रशासनाकडून केले जात आहे.
या संदर्भात चारठाणा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड यांना विचारणा केली असता सदरील दुचाकी अपघात झाल्यामुळे पुलाखाली कोसळली आहे का अथवा चालकाचा ताबा सुटून पुलाखाली कोसळली आहे, याबाबतचा तपास पोलीस प्रशासनाकडून केला जात असल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांपासून अपघातांच्या घटनामध्ये वाढ झाली आहे. राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये अपघाताच्या घटनांचं प्रमाण वाढलं आहे. अतिवेग हे देखील अपघातांचं प्रमुख कारण असल्याचं समोर आलं आहे. नागरिकांनी वाहनं चालवताना वाहतूक नियमांचं पालन करण्याची आवश्यकता आहे. गेल्या काही दिवसांपासून रस्ते अपघात वाढले असून वाहनधारकांनी नियमाचं पालन करावं, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.
घाईगडबडीत कर्ज हवं म्हणून अॅपवरून पैसे घेताय? थांबा ! लोन अॅप घोटाळा समजून घ्या