नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील शेलगाव येथील डॉ. शीला राजेगोरेच्या घरची परिस्थिती हालाखीची आहे. शीलाचे वडील ज्ञानेश्वर राजेगोरे हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांची चार एकर शेती आहे. अत्यंत हालाखीची परिस्थिती असताना देखील ज्ञानेश्वर राजेगोरे यांनी कष्ट करुन आपल्या मुलांना चांगलं शिक्षण दिलं.
नांदेडच्या तरुणानं खडकाळ जमिनीवर फुलवली डाळिंबाची बाग, पहिल्याच वर्षी २५-३० लाखांचं उत्पन्न मिळण्याची आशा
शीला लहान वयापासून अभ्यासात हुशार होती. लहानपणापासून तिचं डॉक्टर होण्याचं स्वप्न होतं. तिने आपलं प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा शाळेत पूर्ण केलं. महाविद्यालयीन शिक्षण शहरात पूर्ण करुन शीलाने वैद्यकीय पूर्व परीक्षा दिली आणि त्यात ती उत्तीर्ण देखील झाली.
एमबीबीएससाठी तिचा सोलापूरला नंबर लागला. पाच वर्षात तिने एमबीबीएस पदवी मिळवली. मुलीच्या शिक्षणासाठी आई वडिलांनी दोन खोल्यांच्या घरात राहून एक – एक पैसा जमवला. एक एकर शेत आणि दोन प्लॉट देखील विकले. आई वडिलांनी केलेल्या कष्टाचं मुलीने सोनं केलं असून तिचं आणि तिच्या आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं आहे. शेलगाव हे शेतकरी चळवळीचं गाव अशी ओळख आहे. गावात मुलीच्या शिक्षणाला फारस कोणी महत्व देत नव्हतं. पण ज्ञानेश्वर राजेगोरे यांनी कष्टाचं रान करत मुलीला घडवलं, शिकवलं आहे.
शीला राजेगोरे गावातील पहिली महिला डॉक्टर
पाच हजार लोकसंख्या असलेल्या शेलगाव गावात आजपर्यंत एकही महिला डॉक्टर नव्हती. कोणतीही महिला, तरुणी नोकरी किंवा उच्चपदावर पोहोचली नाही. मात्र जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर शीला गावातील पहिली डॉक्टर बनली आहे. डॉक्टर पदवी प्राप्त केल्यानंतर आता तिला ग्रामीण भागात आरोग्य सेवा द्यायची आहे.