• Sat. Sep 21st, 2024

प्लेग्रुपमधील शिक्षिकांनीच केला २८ चिमुकल्यांचा छळ; चिमटे, मारहाण करत दिली क्रूर वागणूक

प्लेग्रुपमधील शिक्षिकांनीच केला २८ चिमुकल्यांचा छळ; चिमटे, मारहाण करत दिली क्रूर वागणूक

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः कांदिवली येथील एका प्लेग्रुपमधील (बालवाडीतील) दोन शिक्षिकांनी, दोन ते अडीच वर्षांची मुले आपले ऐकत नाहीत, म्हणून त्यांना अमानुष शिक्षा केल्याची घटना समोर आली आहे. चिमटे काढणे, हाताला मिळेल त्याने मारहाण, मुलांना उचलून आपटणे अशी क्रूर वागणूक या दोन शिक्षिकांनी मुलांना दिली आहे. चिमुकल्यांचा हा अमानुष छळ प्लेग्रुपमधील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सुमारे २८ लहान मुलांना अशी अमानुष शिक्षा करणाऱ्या दोन शिक्षिकांविरुद्ध कांदिवली पोलिस ठाण्यात बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) अभिनियम २००० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कांदिवली पश्चिम येथे हा प्लेग्रुप असून यामध्ये कांदिवली परिसरातील २८ मुले शिकण्यासाठी जातात. या मुलांना शिकवण्याची जबाबदारी संस्थाचालकांनी दोन शिक्षिकांना दिली असून, त्यांच्या मदतीला मुलांना सांभाळण्यासाठी दोन मदतनीस महिलाही आहेत. दोन ते अडीच वर्षांच्या मुलांच्या वागणुकीत अचानक बदल जाणवू लागल्याने पालकांनी संस्थाचालकांची भेट घेतली. त्यांच्याकडे मुलांना नीट शिकवले जात नाही, अशी तक्रार केली. संस्थाचालकांनी पालकांच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन, त्यांनी याबाबत शिक्षिकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता १ मार्चपासून २७ मार्चपर्यंतच्या कालावधीतील प्लेग्रुपमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यामध्ये दोन्ही शिक्षिका मुलांना देत असलेली क्रूर वागणूक पाहून त्यांना धक्काच बसला.

मुलांच्या गालाचे जोरात चिमटे काढणे, हात धरून त्यांना फरफटत नेणे आणि तरीही मुले ऐकली नाही, तर त्यांना हाताने मारहाण करणे, पुस्तकाने मुलांच्या डोक्यावर जोरजोरात मारत असल्याचेही सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले. इतकेच नव्हे, तर त्याहून भयंकर म्हणजे अनेकदा मुलांना उचलून बाजूला आपटत असल्याचेही दिसत होते. संस्थाचालकांनी हा सर्व प्रकार पालकांच्या निदर्शनास आणून दिला. यामुळे सर्व पालक संतापले आणि त्यांनी दोन्ही शिक्षिकांविरुद्ध कांदिवली पोलिस ठाण्यात तक्रार केली.

पालकांच्या सतर्कतेमुळे घटना उघडकीस

लहान मुलांवर जसे संस्कार केले जातात, तशी ती वागतात आणि घडतात असे म्हणतात. कांदिवलीच्या एका कुटुंबातील अडीच वर्षांचा मुलगा घरामध्ये चिडचिड करू लागला. हाताला जे मिळेल ते फेकून मारू लागला. मुलामध्ये अचानक झालेला बदल त्याच्या पालकांच्या लक्षात आला. याबाबत त्यांनी त्याच्यासोबत प्लेग्रुपमध्ये जाणाऱ्या इतर मुलांच्या पालकांशी चर्चा केली. त्यांनी देखील आपली मुले असेच वागत असल्याचे सांगितले. मुलांमध्ये अचानक झालेला बदल हा त्यांना मिळणाऱ्या शिकवणुकीमुळे आणि वागणुकीमुळे झाला असावा, असा संशय पालकांना आला. त्यामुळे सर्व पालक प्लेग्रुप चालविणाऱ्या संस्थाचालकांपर्यंत गेले आणि त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.

पोलीस वडील दंगलीतून सुखरुप घरी परतातच हंबरडा फोडत मुलीने मारली मिठी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed