• Sat. Sep 21st, 2024
अंगणात खेळताना चिमुरड्याने खिळा गिळला, उलट्या थांबेनात; डॉक्टरांनी पोटात दुर्बीण टाकली अन्…

नांदेड: लहान मुले काय खातील आणि काय गिळतील याचा काही नेम नसतो. खेळता खेळता नाणे, सेप्टी पिन, लोखंडी खिळा, कॉईन्स गिळल्याची घटना घडल्या आहेत . असाच काहीसा प्रकार कंधार तालुक्यातील हळदा या गावात समोर आला आहे. एका साडेतीन वर्षाच्या चिमुकल्याने चक्क अडीच इंचाचा लोखंडी खिळा गिळला. पोटात अडकलेला हा खिळा यशस्वीरित्या बाहेर काढून डॉक्टरानी त्या बालकाला जीवनदान दिले आहे.

कंधार तालुक्यातील हळदा येथील रहिवासी असलेला गणेश महारुद्र येलमीटवाड हा साडे तीन वर्षाचा बालक गुरुवारी घरातील अंगणात खेळत होता. अंगणात खेळताना त्याने तब्बल अडीच इंचाचा खिळा त्याने गिळला. ही बाब मुलाच्या बाजूला बसलेल्या आईला समजली. हा खिळा शौचावाटे जाण्यासाठी त्या मुलाला केळी खायला घातली . मात्र, त्यानंतर मुलाला उलट्या सुरु झाल्या. मुलाला उलट्या होऊ लागल्याने आई-वडील घाबरले. त्यांनी गणेशला तात्काळ नायगाव येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. गंभीर बाब असल्याने त्या बालकाला पोटविकार तज्ञ डॉ. कैलाश कोल्हे यांच्याकडे रेफर करण्यात आले. डॉ आश्विन करे आणि डॉ.पंकज राठी यांच्या मदतीने डॉ कैलास कोल्हे यांनी तब्बल एका तासाच्या अथक प्रयत्नानंतर गणेशच्या पोटातून लोखंडी खिळा बाहेर काढला.

धक्कादायक! ४ वर्षीय मुलाच्या पोटाचा एस्क-रे पाहून डॉक्टरही हैराण, नकळत गिळले १८ मण्यांचे…

खिळा काढण्यासाठी गणेश वर कुठलीही शस्त्रक्रिया करण्यात आली नाही. एन्डोस्कोपी म्हणजे पोटात दुर्बिण टाकून हा खिळा गणेशच्या पोटातून बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले. विशेष म्हणजे पोटातील खिळा काढताना डॉक्टरांनी गणेशला कुठलीही जखम होऊ दिली नाही. आता गणेशची प्रकृती ठणठणीत आहे. मुलाच्या पोटातील खिळा बाहेर निघाल्याने गणेशच्या आई वडिलांनी सुटकेचा श्वास घेतला.

धक्कादायक बाब म्हणजे दोन महिन्या पूर्वी एका नऊ महिन्यांच्या चिमुकल्याने खेळता खेळता एक सेंटीमीटरची गोल आकाराची बटन बॅटरी गिळली होती. बाळाच्या घश्यात अडकलेली बॅटरी काढणे डॉक्टरांसाठी आव्हानात्मक होते. मात्र, डॉ कोल्हे यांनी यशस्वीरित्या बाळाच्या घश्यात अडकलेली बटन बॅटरी काढली आणि त्या चिमुकल्याला जीवनदान दिले.

मुलांकडे लक्ष देण्याची गरज

लहान मुले खेळता खेळता लहान दिसेल ती वस्तू तोंडात टाकत असतात. आपण काय खात आहोत हे त्यांना देखील माहिती नसते. तेव्हा मुलांच्या हाती नाणी, पीन, खिळा किंवा इतर वस्तू हाताला लागणार नाही या बाबत पालकांना लक्ष देण्याची गरज आहे. लहान मुले काही गिळले असेल तर घरगुती उपचार करू नये. घरगुती उपचारामुळे पोटातील वस्तू आत जाते. तेव्हा अशा घटना टाळायच्या असतील तर पालकांनी आपल्या मुलांकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन डॉ कैलास कोल्हे यांनी केले आहे.

Urinary Infection Causes | युरिनरी इन्फेक्शन होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed