• Mon. Nov 25th, 2024

    शिंदे गटातील ४० पैकी २८ आमदार फुटणार? संजय राऊतांच्या सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण

    शिंदे गटातील ४० पैकी २८ आमदार फुटणार? संजय राऊतांच्या सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण

    मुंबई: आगामी काळात शिंदे गटातील ४० आमदारांपैकी २८ जण भाजपमध्ये प्रवेश करु शकतात, असे भाकीत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी वर्तविले आहे. बेरोजगारी, महागाई आणि अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी राज्यात दंगली घडवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, लोकं प्रचंड चिडली आहेत. ते मतदान करण्याची संधी कधी मिळेल, याची वाट पाहत आहेत. आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचे कोणतेही नुकसान होणार नाही. शिंदे गटाकडे मतंच नाहीत. ४० आमदार हीच त्यांची ताकद आहे. भविष्यात यापैकी किती आमदार शिंदे गटात राहतील, हे तुम्ही पाहालच. ४० पैकी २८ आमदारांचा एक पाय भाजपमध्ये आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला. ते शुक्रवारी मुंबईत एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते.

    यावेळी संजय राऊत यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली. शिंदे गटात गेलेले आमदार पुन्हा आमच्याकडे आले तर आम्ही त्यांना पक्षात पुन्हा प्रवेश देणार नाही. तो कचरा गेला. ज्या दळभद्री पद्धतीने त्यांनी शिवसेनेशी बेईमानी केली, ते पाहता त्यांना पुन्हा पक्षात घेतले जाईल, असे वाटत नाही, असे राऊत यांनी म्हटले. छत्रपती संभाजीनगरमध्ये सरकारच्या नाकासमोर दंगल घडत आहे. किंबहुना तुम्ही त्या घडवत आहात. संभाजीनगरचं नामांतर अत्यंत शांततेत झालं, तेव्हा दंगल झाली नाही. काही लोकांनी विरोध केला पण तो लोकशाही मार्गाने करण्यात आला. मग कालच दंगल का झाली? राज्यातील जनतेसमोर सध्या शिक्षण, महागाई, आरोग्य, करोनाची साथ पुन्हा येण्याची शक्यता हे प्रश्न आहेत. दंगली घडवून हे प्रश्न सुटणार नाहीत. राज्यात गेल्या दोन वर्षांपासून रामनवमीच्या निमित्ताने दंगली घडवण्याचा एक पॅटर्न तयार झाला आहे. हा दंगलीचा रामनवमी पॅटर्न आहे. गुढीपाडव्याला राज्याच्या विविध भागांमधून शोभायात्रा निघाल्या. पण तेव्हा दंगली झाल्या नाहीत, याकडे संजय राऊत यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

    संभाजीनगरमधील दंगलीमागे बनावट शिवसेनेचा हात; संजय राऊत यांचा निशाणा कुणावर?

    जम्मू काश्मीरमध्ये दगडफेक होई, तेव्हा भाजपकडून सांगितले जाई की, तेथील तरुणांच्या हाताला रोजगार नाही. त्यांच्या हाताला काम नाही. दगड मारण्यासाठी त्यांना पैसे दिले जातात, असे सांगितले जाई. पण आता हाच पॅटर्न महाराष्ट्रात लागू झाला आहे. राज्यातील ज्या तरुणांच्या हाताला काम नाही ते काल डीजे लावून बेभानपणे नाचत होते, असे संजय राऊत यांनी म्हटले.

    तानाजी सावंतांनाही एक डॉक्टरेट द्या, राऊतांनी एका दगडात दोन पक्षी मारले, मंत्र्याची लायकीच काढली

    छत्रपती संभाजीनगरची दंगल ही सरकार पुरस्कृत: संजय राऊत

    छत्रपती संभाजीनगर येथे झालेली दंगल ही सरकार पुरस्कृत होती. उद्धव ठाकरे यांच्या सभांना खेड आणि मालेगावमध्ये मिळणारा प्रतिसाद पाहून या लोकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे काही लोकांना हाताशी पकडून वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न होत आहेत. कारण नसताना जातीय तेढ निर्माण केली जात आहे. शिंदे-फडणवीस सरकार हे काही लोकांना दंगलीसाठी प्रोत्साहन देत आहे, असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *