शेंदुर्णी येथील सरस्वती विद्या मंदिर या शाळेची एम. एच. १९ वाय ५७७८ या क्रमाकांची बस नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांना घेऊन विद्यालयाकडे येत होती. पहूर ते शेंदुर्णीदरम्यान घोडेश्वर बाबाजवळ या बसच्या खालील बाजूस असलेला पाटा तुटल्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. यामुळे बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या खोल भागात पडली. तेथे असलेल्या झाडाला बसची जोरदार धडक बसली. झाडाचे अक्षरश: तुटून दोन तुकडे झाले आणि धडक दिल्यानंतर बस उलटली.
अवघ्या काही सेकंदात घडलेल्या या अपघातामुळे वाहनातील विद्यार्थी आणि शिक्षकांना नेमके काय होतंय? हे कळलं नाही. बस आदळल्यानंतर बसमधील विद्यार्थ्यांनी मोठमोठ्याने आरडाओरड केली. बसमधून सर्व जण कसे तरी बाहेर रस्त्यावर आले. काहींनी याची माहिती तातडीने पालकांना दिली. पहूर येथून अनेकजण मिळेल त्या वाहनाने घटनास्थळी आले. अपघाताची वार्ता वाऱ्यासारखी पसरल्यानंतर नागरिकांनीही घटनास्थळी धाव घेतली. बसमध्ये सुमारे ४० विद्यार्थी आणि काही शिक्षक होते. यातील अंदाजे ३० विद्यार्थी आणि दोन शिक्षक जखमी झाले आहेत. खासगी वाहनांनी काही जखमींना पहूर येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. तर काहींना पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
विद्यार्थी आणि शिक्षकांचे दैव बलवत्तर..मोठी दुर्घटना टळली
स्कूल बसमधील विद्यार्थी आणि शिक्षकांचे दैव बलवत्तर असल्याने मोठा अनर्थ टळला. या अपघातामुळे विद्यार्थ्यांच्या वाहतुकीतील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. बसचा पाटा तुटेपर्यंत या वाहनाची आरटीओ विभागाकडून तपासणी केली गेली नव्हती. तपासणी केली असेल तर वाहन रस्त्यावर आले कसे? वाहनाचा पाटा अचानक कसा तुटला? असे एक ना अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.