दादर येथील कियाराला (नाव बदलले आहे) वयाच्या नवव्या वर्षी मासिक पाळी आली. वयाच्या मानाने लवकर पाळी आल्याने त्यात अतिरिक्त रक्तस्त्राव होत होता. या तक्रारीसाठी तिला डॉक्टरांकडे नेण्यात आले. मुलीला होणारा त्रास पाहून तिचे कुटुंबीय घाबरले होते. त्यांनी अल्ट्रासाऊंड तपासणी करुन विविध डॉक्टरांचा सल्ला घेतला.
डॉक्टरांनी काही औषधे लिहून दिली. तिच्या ओटीपोटात अंतर्गत भागामध्ये सूज आली होती. अशा प्रकारच्या वेदनेचे व्यवस्थापन करण्यासाठी रुग्णावर लक्षणात्मक उपचार केले जातात. आपल्या पोटाला स्पर्श केल्यावर गाठ असल्यासारखे या मुलीला जाणवले. तिने हे आपल्या आईला सांगितले. तिची आई घाबरली आणि तिने पुढील उपचारांसाठी मुलीला वाडिया रुग्णालयात दाखल केले.
बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रनचे बाल शल्यचिकित्सक डॉ. पराग करकेरा यांना या मुलीच्या पोटात गाठ असल्याचे जाणवले. ‘ओटीपोटात दुखत असलेले रुग्ण
नियमितपणे येतात. परंतु तेथे गाठ जाणवत नाही. आम्ही एक सीटी स्कॅन केले. ज्यामध्ये ट्रायकोबेझोअर दिसले, जो पोटातील केसांचा गोळा होता आणि त्याचा काही भाग ड्युओडेनममध्ये (लहान आतड्याचा पहिला भाग) दिसून आला. केस विरघळत नाहीत, म्हणून ते पचनसंस्थेमध्ये राहतात. त्यानंतर ते गोळ्याच्या स्वरुपात सतत वाढत जातात. मुलांमध्ये हे क्वचितच दिसून येते. या रुग्णाला ट्रायकोटिलोमॅनियाचा (यामध्ये रुग्णाला स्वतःचेच केस काढण्याची तीव्र इच्छा निर्माण होते) होता. तसेच असा विकार असलेली व्यक्ती स्वतःचे केस खाते. विशेष म्हणजे तिच्या आई-वडिलांनाही तिचे केस खाण्याबाबत माहिती नव्हती. तपासणीनंतर, तिला गॅस्ट्रोटॉमी आणि केसांचा गोळा काढून टाकण्यासाठी लॅपरोटॉमीचा सल्ला देण्यात आला’, असे डॉ. करकेरा यांनी सांगितले.
अति केलं अन् उद्धव ठाकरेंची माती झाली, आता तरी हनुमंत आणि रामनामाचा जप करा; नवनीत राणांचा सल्ला
कशी झाली शस्त्रक्रिया?
ही शस्त्रक्रिया करण्यासाठी पोटात एक छिद्र तयार करावे लागते. या प्रकरणात ट्रायकोबेझोअर हे गिळलेल्या केसांपासून बनलेले वस्तुमान होते. ही प्रक्रिया सुमारे दोन तास सुरू होती. त्यानंतर शंभर ग्रॅम वजनाचा हा गोळा काढण्यात आला. शस्त्रक्रियेनंतरच्या सातव्या दिवशी तिला घरी सोडण्यात आले. त्यानंतर आता ती या वेदनांपासून मुक्त झाली आहे.