कुणबी – मराठा समाजासाठी असलेल्या ‘सारथी’ आणि ओबीसी समाजासाठी असलेल्या ‘म्हाज्योति’ यांनी त्यांच्याकडील संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप दिली आहे. सारथीने ८५६ तर म्हाज्योतीने १२२६ संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली आहे. मराठा- कुणबी आणि ओबीसी संशोधकांना मुक्तहस्ते फेलोशिप दिली जात असताना अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांबाबतच सरकार हात आखडता का घेत आहे, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्या कारभारावर देखील प्रश्नचिन्ह आंदोलक विद्यार्थ्यांनी उपस्थित केलं आहे.
महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील पीएचडीसाठी २०२१ या वर्षात नोंदणी झालेल्या ८६१ संशोधकांना बार्टी या संस्थेने पात्र ठरवले आहे. मात्र, सरकारकडून निधीच्या कमतरतेचे कारण पुढे केलं गेल्यानं अनुसूचित जाती प्रवर्गाचे विद्यार्थी प्रतीक्षेत आहेत. सध्या फक्त २०० विध्यार्थ्यांनाच फेलोशिप मिळेल अशी माहिती आहे.
गेल्या ४० दिवसापासून संशोधक विद्यार्थी आपले संशोधन आणि अभ्यास केंद्रे सोडून आझाद मैदान येथे बेमुदत धरणे आंदोलन करत आहेत. विद्यार्थी कल्याणच्या बुद्ध विहारात आश्रय घेतात आणि आंदोलनासाठी पुन्हा आझाद मैदानात जमतात. त्या मुलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याची दिवसेंदिवस हानी होत आहे.
फेलोशिपसाठी पात्र ठरलेले बहुतांश विध्यार्थी हे ग्रामीण आणि मूलभूत सुविधा नाहीत अशा भागातील असून ते खूप कष्ट करून पीएचडी पर्यंत पोहचले आहेत. काही जण सोडले तर बहुतांश घरातील ही पहिली पिढी आहे. भूमीहीन , शेतमजूर , कष्टकरी ,वीटभट्टी ,घरकाम करणाऱ्यांची ही मुले आज आपली गुणवत्ता सिद्ध करत आहेत. परंतु, फेलोशिप अभावी त्यांच्यासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.
सारथी या संस्थेची २०२३ या वर्षासाठीचीही फेलोशिपची जाहिरात आता प्रसिद्ध झाली आहे मराठा – कुणबी विद्यार्थ्यांना २०२१आणि २०२२ ला सरसकट फेलोशिप दिली गेली आहे. तर दुसरीकडे,बार्टीची २०२१ ची फेलोशिपची प्रक्रियाही पूर्ण झालेली नाही. अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी ही शैक्षणिक नाकेबंदी आहे, असल्याचं म्हटलं आहे. या प्रश्नावर सारे विचारवंत, साहित्यिक, प्राध्यापक, अभ्यासक, पत्रकार, कलावंत यांनी एकत्र येऊन तातडीने राज्यपालांची भेट घ्यावी, असा विचार पुढे आला आहे.