चंद्रकांत खैरेंचा फडणवीसांसह कराडांवर आरोप
बाळासाहेब ठाकरेंच्या काळात मनोहर जोशी आणि गोपीनाथ मुंडे यांच्या काळात महाराष्ट्रात कुठेही दंगल झाली नाही. शिंदे आणि फडणवीसांच्या काळात इथं दंगल होते, कोण याच्या मागं आहे, असा सवाल चंद्रकांत खैरे यांनी केला. २ एप्रिलचा मविआचा मेळावा होऊ नये यासाठी सरकारकडून वेगवेगळे प्रकार करण्यात येत आहेत, असं चंद्रकांत खैरे म्हणाले. २८ वर्ष शहरात काही होऊ दिलं नाही, असं देखील चंद्रकांत खैरे म्हणाले. संभाजीनगरमधील राडा हा पूर्वनियोजित कट होता, असा आरोप देखील त्यांनी केला आहे. भाजप, देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड आणि इम्तियाज जलील मित्र आहेत. दोघांकडून मिळून गेम सुरु आहे, असं चंद्रकांत खैरे म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर
छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या घटनेबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, संभाजीनगरला घडलेली घटना दुर्दैवी आहे. तेथे शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतू काही नेते भडकावू वक्तव्य देऊन परिस्थिती चिघळवण्याचा प्रयत्न करताहेत. त्यांनी चुकीचे वक्तव्य देऊन परिस्थिती आणखी खराब करु नये. आपली शहरं शांत ठेवण्याचा प्रयत्न सर्वांना केला पाहिजे. आज मर्यादा पुरुषोत्तम श्री रामनवमी आहे. जे नेते राजकीय वक्तव्य देऊन तेथील परिस्थिती आणखी बिघडावी, असा प्रयत्न करताहेत, ते दुर्दैवी तर आहेच, पण त्यांची राजकीय बुद्धी किती छोटी असेल हे दाखवून देणारं असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले.