गिरीश बापट गेल्या अनेक महिन्यांपासून दुर्धर आजाराशी झुंजत होते. पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यामुळे नुकत्याच पार पडलेल्या कसबा पोटनिवडणुकीत त्यांचा सक्रीय सहभाग असणार की नाही? असला तर त्याचा फटका काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांना बसणार का? अशा चर्चा व्हायला सुरुवात झाली. सुरुवातीला प्रचारात सहभागी होणार नाही, असं बापटांनी सांगितलं. पण कसब्यातलं वारं विरोधात जातंय, असं लक्षात येताच भाजपने बापटांना मैदानात उतरवलं. बापटांनीही तब्येतीची तमा न बाळगता पक्षनेतृत्वाचा आदेश मानून नाकाला नळ्या असताना भाजपचा प्रचार केला. पण कसब्याची जागा राखण्यात यावेळी मात्र भाजपला अपयश आलं.
कसब्याचं मैदान मारल्यानंतर काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर गिरीश बापट यांचे आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या घरी गेले. धंगेकरांना पाहतक्षणी गिरीश बापटांनी त्यांचं निवडून आल्याबद्दल अभिनंदन केलं, पुढच्या राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. धंगेकरांनी बापटांना नमस्कार केला, आशीर्वाद राहू द्यात… असं लडीवाळपणे म्हणाले. त्यावर भाऊंनी क्षणाचाही विलंब न लावता, रवी काही अडचण आली तर सांग, काही लागलं तर कळव… असं धंगेकरांना उद्देशून म्हणाले. धंगेकरांच्या डोळ्यात टचकन पाणी आले.
रवींद्र धंगेकरांनी २००९ आणि २०१४ साली गिरीश बापट यांच्याविरोधात निवडणूक लढवली. दोन्ही वेळा तिरंगी लढती झाल्या. मतविभाजनामुळे गिरीश बापटांनी दोन्ही वेळी बाजी मारली. एकदा तर गिरीश बापट हरता हरता जिंकले. धंगेकरांनी बापटांना घाम फोडला होता. ती निवडणूक बापटांनी केवळ ९ हजार मतांनी जिंकली. परंतु आपल्या विरोधात लढणारा उमेदवार म्हणून बापटांनी कधी धंगेकरांकडे पाहिलं नाही. निवडणूक झाली की सगळ्यांशी त्यांचे मित्रत्वाचे संबंध असायचे.
पुण्यात सुसंस्कृत राजकारण रुजविण्यात गिरीश बापट यांचा फार मोठा वाटा राहिलेला आहे. आज एकंदरीत महाराष्ट्राचं विखारी राजकारण बघता पुण्याला या राजकारणापासून गिरीश बापट यांनी कायम अलिप्त ठेवलं. पुण्याबाहेरचे नेते पुण्यात येऊन एकमेकांबद्दल राजकीय उणीदुणी काढत असताना, एकमेकांवर चिखलफेक करत असताना गिरीश बापट यांनी मात्र पुण्यातल्या वाडेश्वर कट्ट्यावर सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र आणून सुसंस्कृत राजकारणाची परंपरा कायम ठेवली.
