• Fri. Jul 31st, 2026
    Jalgaon Rain : खान्देशात आभाळ फाटलं, पण माणुसकीचं दर्शन, जवानांनी एक महिन्याच्या बाळाला पुरातून सुखरुप बचावलं

    खान्देशात पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे नदी, नाल्यांना पूर आल्यासारखी स्थिती आहे. अमळनेर आणि पारोळा तालुक्यात तर भीषण अवस्था आहे. अमळनेरमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांचे प्रशासनाकडून रेस्क्यू ऑपरेशन केले जात आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जळगाव : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडतोय. खान्देशातील जळगाव, धुळे या जिल्ह्यांमध्ये अक्षरश: आभाळ फाटले आहे, अशा स्वरुपाचा पाऊस पडत आहे. हवामान विभागाकडून 31 जुलैसाठी या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. जळगावच्या अमळनेरमध्ये भीषण अवस्था बघायला मिळाली. मुसळधार पाऊस आणि बोरी नदीला आलेल्या पुरामुळे अमळनेरमध्ये घरांमध्ये पाणी शिरलं. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं. अमळनेर तालुक्यात काही ठिकाणी गावांचा संपर्कदेखील तुटल्याची घटना समोर आली.

    मुसळधार पावसामुळे अमळनेर शहरात सर्वत्र पाणी साचल्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आलं. प्रशासनाकडून पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आलं. घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना प्रशासनाने रेस्क्यू ऑपरेशन करून घराच्या बाहेर काढले. यामध्ये एक महिन्याच्या बाळाचा देखील समावेश आहे. बचाव पथकाने सुरक्षितपणे एक महिन्याच्या बाळाचे सुखरुप रेस्क्यू केले.

    हातनूर धरणाचे सर्व दरवाजे उघडले

    जळगाव जिल्ह्यासह हातनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून हातनूर धरणाचे सर्व 41 रेडियल दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले आहेत. तापी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

    हातनूर धरणात किती टक्के पाणीसाठा?

    आज (३१ जुलै) दुपारी १२ वाजेच्या आकडेवारीनुसार हातनूर धरणाची पाणीपातळी २११.७५० मीटर इतकी नोंदविण्यात आली असून, धरणाची एकूण पाणीसाठा क्षमता २६८.५० दशलक्ष घनमीटर (६९.२० टक्के) तर उपयुक्त पाणीसाठा १३५.५० दशलक्ष घनमीटर (५३.१४ टक्के) इतका आहे.

    धरणातून ८,९२६ घनमीटर प्रति सेकंद (सुमारे ३,१५,२२२ क्युसेक्स) वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू असून, कालपासून पाणलोट क्षेत्रात ८६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हंगामातील एकूण पर्जन्यमान २५८ मिमी इतके झाले आहे. कालव्यामधून ५.६६ घनमीटर प्रति सेकंद इतका विसर्ग सुरू असून आर.एस. गेटद्वारे कोणताही विसर्ग करण्यात आलेला नाही.

    तापीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

    धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत असल्याने तापी नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी नदीपात्रात जाणे टाळावे, जनावरे, शेतीची अवजारे आणि इतर साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे. तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. परिस्थितीवर जलसंपदा विभाग आणि जिल्हा प्रशासनाचे सातत्याने लक्ष असून आवश्यकतेनुसार पुढील उपाययोजना करण्यात येत आहेत.

    अमळनेर-जळगाव वाहतूक ठप्प

    जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांमध्ये गावांमध्ये पाणी शिरले आहे. यात अंमळनेर येथे जाणाऱ्या रेल्वेच्या बोगदा पूर्ण क्षमतेने सती माता मंदिराजवळ भरला असल्याने जळगावकडून अमळनेरकडे जाणारी पाहणे आणि अमळनेरकडून जळगावकडे येणारी वाहने सकाळपासून अडकून आहेत. तर पारोळा तालुक्यातील मसवी, मोंढळे या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे.

    जिल्हाधिकाऱ्यांचं मोलाचं आवाहन

    यावल, रावेर, अमळनेर, भुसावळ, जामनेर असेल प्रत्येक तालुक्यांमध्ये सतत आज सकाळपासून जोरदार पाऊस पडत आहे. जळगाव जिल्ह्यात कालपासूनच पाऊस सुरू असल्याने जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी नागरिकांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. ज्या ठिकाणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असेल त्या नदीच्या आजूबाजूच्या गावांनी सतर्क राहावे. तसेच नदी, नाले पाण्याने भरले असल्याने त्या ठिकाणी गर्दी करु नये, असंदेखील आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा