वाह रे आरोग्यमंत्री… जेव्हा संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाशी झुंजत होता आणि मविआ सरकार कोरोनावर मात करण्यासाठी लढत होते, सर्वसामान्यांना उपचार मिळावेत, लसीकरण व्हावे, रोगाचे निर्मूलन व्हावे म्हणून काम करत होते, तेव्हा तुम्ही तत्कालिन सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्याने बंड करण्याची, सरकार पाडण्याची आणि राज्यात अस्थिरता आणण्याची खलबतं करत होतात. त्यासाठी देवेंद्र फडणवीसांसोबत बैठका घेत होतात.
ज्यांना राज्य एका महाभयंकर रोगाचा सामना करत असतानाही सत्तालोलुपता जास्त प्रिय वाटते, त्यांच्याकडे आज राज्याच्या आरोग्याची जबाबदारी ईडी सरकारने टाकली आहे यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेचे दुर्दैव ते अजून काय असावे? असा संतप्त सवाल राष्ट्रवादीने केला आहे.
जितेंद्र आव्हाड सावंतांवर तुटून पडले
आज सत्य समोर आलं. सत्ताबदलामध्ये तानाजी सावंत यांचे काम हे काऊन्सिलिंग आणि मिटिंगचे होते. त्यांनी एकनाथ शिंदेंबरोबर आमदारांचे काऊन्सिलिंग केल्यानंतर १००-१५० बैठका घेतल्या. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर १००-१५० बैठका घेतल्या. आमदारांचं मतपरिवर्तन केलं आणि मग सत्ता परिवर्तन झालं. म्हणजे सत्ता परिवर्तनाच्या मागे प्रमुख भूमिका तानाजी सावंत यांची होती. हे आज महाराष्ट्राला कळलं. अर्थात गद्दारी करायची हे आधीच ठरले होते आताची देत असलेली कारण खोटी आहेत हेच सिध्द होते, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सावंत यांच्यावर निशाणा साधलाय.
तानाजी सावंत नेमकं काय म्हणाले होते…?
नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणुका लढलो. लोकांनी आमच्या बाजूने कौल दिला. मात्र उद्धव ठाकरे भाजपशी बेईमानी करुन मविआ सरकार स्थापन केलं. ते सरकार पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व मी आमदारांचे कॉन्सलिंग करण्यासाठी दीडशे बैठका घेतल्या, असं डॉ. सावंत म्हणाले.