गुणरत्न सदावर्ते यांनी वकिलाचा गाऊन आणि बँड परिधान करून मुंबईत विविध आंदोलनात हजेरी लावली होती. तसेच त्या ड्रेसमध्ये त्यांनी विविध प्रकारची घोषणाबाजीही केली होती. अशा कृत्यामुळे समस्त वकिलांची प्रतिमा मलिन होत असल्याचं म्हणत सदावर्ते यांच्या विरोधात वकील सुशील मणचेकर यांनी शिस्त पालन याचिका तक्रार केली होती. आज याबद्दल बार कौन्सिलच्या तीन सदस्यीय समितीने निकाल देत सदावर्ते यांची दोन वर्षे सनद रद्द केली आहे. त्यामुळे आता गुणरत्न सदावर्ते यांना कोणत्याही कोर्टात वकिली प्रॅक्टिस करता येणार नाही.
वकिसांसाठी एक आचारसंहिता असते. तिचं उल्लंघन करु नये, अशी अट सनद देताना बार कौन्सिल घालत असते. मात्र याचं अटींचं उल्लंघन केल्याने बार कौन्सिलने सदावर्ते यांच्यावर २ वर्षांसाठी सनद रद्द करण्याची कारवाई केलीये. शिस्तभंगाची कारवाई केली आहे, असं बार कौन्सिलच्या वतीने सांगण्यात आलंय.
दरम्यान, बार कौन्सिलच्या निर्देशाविरोधात गुणरत्न सदावर्ते कोर्टात धाव घेण्याची शक्यता आहे. याआधीही बार कौन्सिलच्या निर्णयाविरोधात सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. सध्या गुणरत्न सदावर्ते राजधानी नवी दिल्लीत आहेत. यावर सविस्तर बोलेन, अशी प्रतिक्रिया त्यांनी ‘मटा ऑनलाईन’शी बोलताना दिलीये.
गुणरत्न सदावर्ते कोण आहेत?
गुणरत्न सदावर्ते हे महाराष्ट्रातील विधिज्ञ आहेत. महाराष्ट्र शासनाने २०१८ साली मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास (SEBC) प्रवर्ग अंतर्गत आरक्षण दिले होते. मात्र मराठ्यांना दिलेले आरक्षण हे असंवैधानिक असल्याची याचिका त्यांनी सर्वोच्च न्यायालयात लढवली.
ॲड सदावर्ते हे मुळचे नांदेडचे आहेत. त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण औरंगाबाद आणि मुंबईत झालं. ते विविध चळवळींत आधीपासूनच सक्रिय होते. नांदेडला ते ‘सम्यक विद्यार्थी आंदोलन’ही त्यांची संघटना चालवायचे आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न हाताळायचे.
एसटीच्या आंदोलनातही सदावर्ते यांनी आंदोलनकर्त्यांची हाटकोर्टात भूमिका मांडली. याच आंदोलनात ते महाराष्ट्रात लोकप्रिय झाले. तत्कालिन ठाकरे सरकारविरोधात त्यांनी रान उठवलं. मविआ सरकारविरोधी त्यांनी त्वेषाने लढा दिला. यावेळी सदावर्ते भाजपला अनुकूल भूमिका घेत असल्याचाही त्यांच्यावर आरोप झाला.