याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, भोर पोलिसांना १७ मार्च रोजी भोर महाड रस्त्यावर एक अनोळखी मृतदेह सापडला होता. त्याचा तपास करत असताना पोलिसांना माहिती मिळाली की, दतात्रय पिलाने याच्याकडून अक्षय होळकर याने पाच ते सहा लाख रुपये उसने घेतले होते. पैसे घेऊन अनेक दिवस झाल्याने दतात्रय अक्षयकडे पैशांची मागणी करू लागला. मात्र सतत पैशाचा तगादा लावल्याने अक्षयच्या डोक्यात दत्तात्रय याला संपवण्याचा प्लॅन आला.
त्यानुसार १० मार्च रोजी अक्षय याने दत्तात्रय याला बोलवून घेतले. त्यानंतर त्याला गाडीत बसवून त्याच्यावर गाडीतच चाकूने, हातोडीने घाव घालून त्याचा खून केला. अक्षय याने त्याचा मित्र समीर याच्या मदतीने हा खून केला. त्यानंतर त्याची ओळख पटू नये म्हणून त्याच्या अंगावरचे कपडे जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा मृतदेह वरांधा घाटातील वारवंड गावाच्या हद्दीत फेकून दिला. त्यानंतर पोलिसात दत्तात्रय हरवला असल्याची तक्रार देण्यात आली. त्यानंतर पोलीस शोध घेत असताना त्याचा मृतदेह १७ मार्चला सापडला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटत नव्हती.
त्यानंतर पोलिसांनी पुणे आणि सातारा या ठिकाणी हरवलेल्या व्यक्तींची माहिती मिळवली. त्यानंतर सिंहगड पोलिस स्टेशनमध्ये दत्तात्रय पिलाने मिसिंग असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी त्याच्या वडिलांकडे चौकशी केली. वडिलांनी सांगितलेल्या माहितीनुसार त्याचा मित्र अक्षयला पोलिसांनी बोलवून घेतले. त्यानंतर पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी अक्षय आणि त्याच्या मित्रावर गुन्हेशाखेच्या मदतीने पाळत ठेवली.
त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांनी खुनाची कबुली दिली. भोर पोलिसांनी अतिशय शिताफीने तपास करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्या कामगिरीचे कौतुक करण्यात येत आहे.