यावेळी संजय राऊत यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयीची त्यांच्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली. आम्ही वेळोवेळी वीर सावरकर यांच्याविषयीची पक्षाची भूमिका स्पष्ट कर आलो आहोत. माझी यासंदर्भात राहुल गांधी यांच्याशी चर्चा झाली आहे. मी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांच्याशीही बोललो. सावरकर हे आमच्या श्रद्धेचा विषय आहे. मी दिल्लीत जाईन तेव्हा राहुल गांधी यांची भेट घेऊन त्यांच्याशी सावरकरांबाबत चर्चा करेन, असे संजय राऊत यांनी सांगितले.
यावेळी संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंच्या मालेगावातील सभेविषयी प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना फटकारले. मालेगावच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांना सावरकरांच्या मुद्द्यावरुन सुनावलेले खडे बोल ही मॅचफिक्सिंग होती, असा आरोप झाला होता. त्यावर संजय राऊत यांनी टोला लगावताना म्हटले की, मॅचफिक्सिंगचा आरोप कोण करत आहे? ते पक्ष नव्हेत पिसं गेलेले कावळे आहेत. आमचा पक्ष काय आहे, हे आम्हाला माहिती आहे. मालेगावच्या विराट सभेने आमचा पक्ष काय आहे, हे सगळ्यांना दिसलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात तुमचं मॅचफिक्सिंग सुरु ठेवा, असे संजय राऊत यांनी म्हटले.
उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत जाणार नाहीत: संजय राऊत
गेल्या आठवड्यात विधानभवनात देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली होती. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी हसतखेळत गप्पा मारल्या होत्या. तेव्हापासून उद्धव ठाकरे आणि भाजप पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, ही शक्यता संजय राऊत यांनी फेटाळून लावली. मला दिल्लीत संसदेच्या लॉबीत पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि जे.पी. नड्डा रोज भेटतात. सत्ताधारी आणि विरोधकांचा येण्याजाण्याचा रस्ता एकच आहे. त्यामुळे फडणवीस-ठाकरेंच्या भेटीनंतर ते पुन्हा एकत्र येणार, असा निष्कर्ष काढणे चुकीचे आहे. उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत जाणार नाहीत, असे संजय राऊत यांनी सांगितले.