• Thu. Nov 28th, 2024

    देशातील सर्वात उंच रेल्वे पुलावरुन धावणार वंदे भारत; अशी आहेत चिनाब पुलाची वैशिष्ट्ये

    देशातील सर्वात उंच रेल्वे पुलावरुन धावणार वंदे भारत; अशी आहेत चिनाब पुलाची वैशिष्ट्ये

    म. टा. प्रतिनिधी, जम्मूः देशभरातील रेल्वे प्रवाशांची वंदे भारत एक्स्प्रेसच्या अलिशान आणि आरामदायी प्रवासाला पसंती मिळत आहे. उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे जोड प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित झाल्यावर या मार्गावरील चिनाब पुलावरूनही वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे, अशी घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रविवारी केली.जगातील सर्वांत उंच रेल्वे पूल असलेल्या चिनाब रेल्वे पुलावरून रेल्वेमंत्री वैष्णव यांच्या उपस्थितीत ट्रॅक माउंटेड व्हेइकल अर्थात रेल्वे ट्रॉली रविवारी धावली. या निमित्ताने रेल्वेमंत्री यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. प्रकल्प जानेवारी २०२४पर्यंत पूर्ण होणार असून त्यानंतर यावरून रेल्वे वाहतूक सुरू होणार आहे, असे वैष्णव यांनी सांगितले.

    वंदे भारत एक्स्प्रेसच्या देखभालीसाठी काश्मीर खोऱ्यातील बडगाम जिल्ह्यात देखभाल सुविधा उभारण्यात येणार आहेत. यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. शहरांतर्गत प्रवास वेगवान आणि सुरक्षित होण्यासाठी वंदे भारत मेट्रोची बांधणी करण्यात येणार आहे. उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे प्रकल्पानंतर जम्मू आणि श्रीनगर दरम्यान वंदे भारत मेट्रो चालवण्याचे नियोजन असल्याची माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिली.

    चिनाब नदीवरील पुलाच्या निर्मितीचे मोठे अवघड काम रेल्वे अभियंत्यांनी पूर्ण केले आहे. यामुळे प्रवासी वाहतुकीसह मालवाहतुकीला विशेषत: काश्मिरी सफरचंद रेल्वेमार्गे देशाच्या कानाकोपऱ्यात कमी खर्चात आणि कमी वेळेत पोहोचवणे शक्य होणार आहे. बांधकाम साहित्य, जीवनावश्यक वस्तू काश्मीर खोऱ्यात आणण्यासाठी वाहतूक खर्च मोठ्या प्रमाणात होतो. यामुळे वस्तूंच्या किंमतीमध्ये वाढ होते. यासाठी बनिहाल ते बारामुल्ला दरम्यान प्रधानमंत्री गतिशक्ती योजनेंतर्गत चार कार्गो टर्मिनल उभारण्यात येणार आहेत. यापैकी दोन टर्मिनलसाठी जागा निश्चित करण्यात आली असून उर्वरित दोन टर्मिनलसाठी जागा लवकरच निश्चित करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

    चिनाब पुलाची वैशिष्ट्ये

    – वेल्डिंगच्या आधारे पुलाची जोडणी करण्यात आली आहे. या सर्व वेल्डिंग एकमेकांना जोडल्यास त्याची लांबी सुमारे ६०० किमी होईल.

    – पॅरिसमधील आयफेल टॉवरपेक्षा ३५ मीटर उंच.

    – चिनाब नदीपातळीपासून ३५९ मीटर उंचावर. पुलाची लांबी १,३१५ मीटर.

    – २८,६६० मेट्रिक टन स्टीलचा वापर.

    – पुलाच्या मजबुतीकरणासाठी अर्धे फुटबॉल मैदान मावू शकेल अशा जागेत पायाभरणी.

    – खोऱ्यातील अतिवेगवान वाऱ्याचा विचार करून विशेष तंत्रज्ञानाचा वापर. त्यामुळे कमाल २६६ किमी प्रतितास वेगवान वाऱ्याला तोंड देण्यास पूल सक्षम.

    – आयआयटी रुरकीच्या मदतीने भूकंपप्रतिरोधक तंत्रज्ञानाचा वापर. ८ रिश्टर स्केलपर्यंत क्षमतेच्या भूकंपाचा धक्का सहन करण्याची क्षमता.

    – एकूण खर्च : १,४८६ कोटी

    – कमाल १०० किमी प्रतितास वेगाने रेल्वेगाड्या या पुलावरून धावू शकणार.

    – पुलाचे सरासरी किमान आयुर्मान १२० वर्षे.

    वंदे भारतचा प्रकल्प परळीबाहेर जाऊ दिला नसता, धनंजय मुंडेंची पंकजांवर टीका

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed