बुलडाणा: सध्या सर्वत्र गुळगुळीत रस्ते आणि हाय स्पीड झाल्याने अपघात देखील फार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. एकीकडे जिल्ह्यात समृद्धी महामार्गावरील अपघात थांबण्याचे नाव घेत नसताना त्याच्या लगतचे रस्त्यांवर देखील अपघात वाझढले आहेत. अपघाताच्या मालिकांमध्ये सुसाट वेग अनियंत्रित ड्रायव्हिंग नवशिके ड्रायव्हर हेच अपघातास कारणीभूत ठरत आहे. चार दिवसांपूर्वी घेतलेली नवीन चार चाकी वाहन घेऊन देवदर्शनासाठी निघाले आणि अनर्थ घडला आहे. यामध्ये एका चिमुकल्याने जीव गमावला आहे. तर, दुसऱ्या चिमुकल्याची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघाताने संपूर्ण जिल्हा स्तब्ध झाला आहे. या अपघातात पाच जण गंभीर झाले आहेत.संतनगरी शेगावच्या गजानन महाराजांच्या दर्शनासाठी निघालेल्या लोणार येथील निखाडे कुटुंबीयांच्या वाहनाला झालेल्या अपघातात जुळ्या मुलांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. तर पत्नी, मुलगा आणि चालक गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात नागपूर येथील दोघे जण जखमी झाले आहेत. लोणार येथील गजानन निखाडे हे आपल्या परिवारासह (एमच ४६ डब्ल्यू ३८३३ क्रमांकाच्या) मारोती अल्टो कारने शेगाव येथे दर्शनासाठी जात होते. दरम्यान, घरून निघून जेमतेम अर्धा तास होत नाही तोच काळ त्यांना आडवा आला.
ताडोबात दिसली बिजलीची माया; आईसोबत लडिवाळपणे खेळणाऱ्या बछड्यांचे दुर्मिळ क्षण कॅमेरात कैद
मेहकर जालना रस्त्यावर चिंचोली बोरे फाट्याजवळ त्यांच्या वाहनाला नागपूर येथून येणाऱ्या (एमएच ४६ एन ४५३४) स्कॉर्पिओने धडक दिली. अपघातात अल्टोमधील आर्यन गजानन निखाडे (वय १० वर्षे) याचा मृत्यू झाला आहे. तर त्याची आई सविता गजानन निखाडे (वय वर्ष ३५), जुळा भाऊ अंश गजानन निखाडे (वय वर्ष १०), चालक अंकुश उद्धव अवचार (वय वर्ष ३१) आणि स्कॉर्पिओमधील सुयोग परसराम भुके, अक्षय डिगांबर रनगारी (राहणारे नागपूर) हे जखमी झाले आहेत.
जखमींना मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तपास मेहकरच्या पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वसंत पवार करत आहेत.