• Mon. Nov 25th, 2024
    देवेंद्र फडणवीसांचं अण्णा हजारेंना खास गिफ्ट; अण्णांचा ड्रीम प्रोजेक्ट आता सत्यात उतरणार

    अहमदनगर: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना अनेक दिवसांनंतर प्रत्यक्ष भेटून आनंद झाला, असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गावे जलस्वयंपूर्ण करण्याची योजना जाहीर केली. ‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार’ ही हजारे यांची आवडती योजना आता सरकार प्रभावीपणे राबविणार असल्याचे फडणवीस यांनी जाहीर केले. पारनेर तालुक्यातील उद्योजक मच्छिंद्र लंके आणि सुरेश पठारे यांच्या कन्हैया अॅग्रो प्रकल्पाच्या गटेवाडी येथील नव्या प्रकल्पाचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, आदर्शगाव संकल्प आणि प्रकल्प योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यावेळी उपस्थित होते.

    यावेळी बोलताना फडणवीस यांनी राज्य सरकारने अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या योजनांची माहिती दिली. फडणवीस म्हणाले, हजारे आणि पवार यांच्या प्रेरणेतून सुरू केलेली जलयुक्त शिवार योजना मधल्या काळात राजकारणामुळे बंद पडली होती. आता ती पुन्हा सुरू करीत आहोत. हजारे यांची खूप दिवस प्रत्यक्ष भेट झाली नव्हती. फोनवर बोलणे होत असे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांची भेट होणार असल्याने आपण येथे आलो. हजारे यांच्या विचारांतील गाळमुक्त धरण आणि गाळयुत्त शिवार ही योजना राबविण्यात येणार आहे. यातून धरणांतील गाळ काढला जाऊन पाण्याची साठवण क्षमता वाढेल आणि तोच गाळ शिवारात आल्याने उत्पादन वाढीस मदत होईल. यातून गावे जलस्वयंपूर्ण करण्याचा मानस आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.
    ‘संभाजीनगर’वरुन आंदोलन करणाऱ्या MIM कार्यकर्त्यांना फडणवीसांनी ठणकावलं

    पशुधनाचे महत्व सांगताना फडणवीस म्हणाले, आपल्या संस्कृतीत गायीची पूजा केली जाते, गाईला माता मानले जाते. सुरवातीला यावर जगातील काही मंडळी हसत होती. आता मात्र हे सर्वांनी मान्य केले आहे. शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी पशुधन आवश्यक आहे. शेती आणि पशुखाद्य क्षेत्रातही नैसर्गिक उत्पादने आणि दर्जा यावर भर दिला पाहिजे. पशुखाद्य क्षेत्रात हे काम यशस्वी होण्यासाठी आवश्यक ती प्रचार-प्रसार मोहीम राबविण्यास सरकार तयार आहे. मच्छिंद्र लंके आणि सुरेश पठारे यांच्यासारख्या उद्योजकांनी पुढाकार घेतला तर सरकार नक्कीच या क्षेत्रात काम करायला तयार आहे. रासायनिक खतांवरील खर्च कमी होऊन नैसर्गिक शेतीला चालना मिळाली तर शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात बचत होऊन नफाही वाढेल. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविताना या गोष्टींकडेही लक्ष दिले पाहिजे. राळेगणसिद्धी येथून सौर कृषीपंप फीडर योजना सुरू झाली. ती कमालीची यशस्वी झाली आहे. त्यामुळे त्याचा पुढचा टप्पा आता सुरू करीत आहोत. त्यातून शेतकऱ्यांना स्वस्तात आणि दिवसाही वीज मिळण्यास मदत होणार आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *