राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर गेल्या दोन महिन्यात तिसऱ्यांदा ईडीची धाड पडली आहे. यामुळे हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे दरम्यान आता विविध स्तरातून याबाबतच्या प्रतिक्रिया येत असून हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी नसल्याचे समजत आहे. दरम्यान त्यांच्यावर झालेल्या कारवाईचा तीव्र निषेध करण्यात येत असून हसन मुश्रीफ यांचे कार्यकर्ते कागल येथील निवासस्थानी एकत्रित जमले असून जोरदार घोषणाबाजी सुरू झाली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि तपास करण्यात कोणतीही बाधा येऊ नये यामुळे केंद्रीय पोलीस फोर्स आणि कोल्हापूर पोलिसांचा मोठा बंदोबस्त येथे तैनात करण्यात आलेला आहे. तर आक्रमक झालेले कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये देखील जोरदार बाचाबाची होत असून आम्हाला गोळ्या घाला मात्र साहेबाना विनाकारण यात अडकवले जात आहे, असा आरोप कार्यकर्त्यांनी केला. घरात लहान मुलं आहेत, त्यांना ताप आलाय. त्यांना काही झालं किंवा घरातील एकाही बाईला धक्का लागला तर आम्ही शांत बसणार नाही, असा इशाराही मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांनी दिला.
तर भाजप आणि किरीट सोमय्या तसेच ईडीविरोधात येथे जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. हसन मुश्रीफ हे अधिवेशन संपून आज कोल्हापुरात येणार असल्याने पहाटेपासूनच अनेक कार्यकर्ते आपले विविध कामे घेऊन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी आले होते. मात्र, अचानक ईडीचे अधिकारी आल्याने कार्यकर्ते आणि गावकरी देखील संभ्रमात पडले. मात्र, ईडीचे अधिकारी आहेत समजताच कार्यकर्ते घरी न जाता येथेच आंदोलनाला सुरुवात केली. दरम्यान हसन मुश्रीफ हे कोल्हापुरात नसून त्यांच्या मुलांची आणि कुटुंबातील इतर सदस्यांची चौकशी सध्या ईडीचे अधिकारी करत आहेत.
मुश्रीफांच्या पत्नीची संतप्त प्रतिक्रिया
दरम्यान हसन मुश्रीफ यांच्या पत्नीने देखील संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. समाजासाठी मुश्रीफ साहेब एवढं काम करतात. मात्र, असे असले तरी ईडीकडून त्यांना त्रास दिला जात आहे. आम्हाला किती त्रास देणार आहात, आम्हाला गोळ्या मारून टाका, अशी संतप्त प्रतिक्रिया देखील हसन मुश्रीफ यांच्या पत्नीने दिली आहे.