पुणे, दि. 10 : बदलत्या जीवन शैलीत आहाराकडे होत असलेले दुर्लक्ष आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या आजारांवर मात करण्यासाठी तृणधान्याचा आहारात समावेश वाढवण्यासाठी 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. तृणधान्याचे उत्पादन वाढीसाठी व त्याचा आहारात वापर वाढविण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी सक्रियता वाढवावी, अशा सूचना कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांनी आज दिल्या.
तृणधान्य वर्षानिमित्त नियोजनासाठी स्थापित राज्य कृती दलाची पहिली बैठक साखर संकुल,पुणे येथे झाली. त्यावेळी श्री. चव्हाण बोलत होते.
यावेळी सुभाष नागरे, संचालक कृषि प्रक्रिया आणि नियोजन, दिलीप झेंडे,कृषि संचालक निविष्ठा व गुण नियंत्रण, विकास पाटील, कृषी विस्तार व प्रशिक्षण संचालक, परभणी संशोधन कृषि विद्यापीठाचे संचालक डॉ.दत्तप्रसाद वासकर,माहिती उपसंचालक डॉ.राजू पाटोदकर, समाजकल्याण विभागाचे उपसंचालक एस.एस. रणखांबे आदी उपस्थित होते.
आयुक्त श्री. चव्हाण पुढे म्हणाले की, पारंपरिक लोककलांच्या माध्यमातून गावोगावी विविध कार्यक्रम घेऊन लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत तृणधान्याचे महत्त्व पटवून देण्यात येणार आहे. तसेच पथनाट्य, प्रशिक्षणे, विविध माध्यमांद्वारे माहिती प्रसारित करणे, महाविद्यालये, शासकीय कार्यालये याठिकाणी प्रचार, प्रसिद्धी करावी. पुढच्या रब्बी हंगामापर्यंत प्रत्येक गावांत सीड बँक तयार करावी. त्यामुळे तृणधान्याच्या उत्पादन वाढीस निश्चितच मदत होईल. प्रशिक्षण आयोजित करताना तृणधान्याच्या महत्त्वाबरोबरच अन्य लोकोपयोगी विषयाची माहिती दिल्यास प्रशिक्षणास चांगला प्रतिसाद मिळेल, असे सांगून ते पुढे म्हणाले, उत्पादन व उत्पादकता वाढ, पोषण मूल्य व आरोग्य विषयक कायदे, मूल्यवर्धन, प्रक्रिया व पाककृती विकास, नव उद्योगातून व्यावसायिक दृष्टिकोन वाढविणे, प्रचार-प्रसिध्दीतून जनजागृती करणे, निर्यातवृद्धी व धोरणात्मक निर्णयातून अंमलबजावणी या सप्तसुत्रीद्वारे पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे करण्यात येत आहे.
कृषी विस्तार प्रशिक्षण संचालक विकास पाटील यांनी प्रास्ताविकात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 साठी राज्यात सुमारे 250 कोटींची तरतूद करण्यात आली असल्याचे सांगितले. तसेच सादरीकरणाद्वारे महाराष्ट्र मिलेट मिशन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तृणधान्य विशेष महिना संकल्पनाही विशद केली. त्यानुसार जानेवारी महिना- बाजरी, फेब्रुवारी- ज्वारी, ऑगस्ट- राजगिरा, सप्टेंबर- राळा, ऑक्टोबर- वरई आणि डिसेंबर- नाचणी याप्रमाणे राबविण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच कृषि विद्यापीठांतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती देऊन उत्पादन वाढीसाठी प्रत्येक जिल्ह्यात घेण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली.
यावेळी मराठवाडा परभणी विद्यापीठाचे संचालक डॉ.दत्तप्रसाद वासकर यांनी येत्या रब्बी हंगामात 100 एकर शेतीमध्ये परभणी शक्ती ही ज्वारीचे वाण पेरण्यात येणार असल्याचे सांगितले.
माहिती उपसंचालक डॉ. पाटोदकर यांनी माहिती व जनसंपर्क विभागामार्फत माहे फेब्रुवारी 2023 चा लोकराज्य तृणधान्य विशेषांक काढल्याचे सांगून या विभागामार्फत विविध प्रसार माध्यमांद्वारे सर्वांगीण प्रसिध्दी करण्यात येईल, असे सांगितले. तर अर्चना ठोंबरे व डॉ. सोनम कापसे यांनी आहारातील तृणधान्याचे महत्त्व सांगितले.
000