• Sat. Sep 21st, 2024

वीर बिरसा मुंडा यांच्या शूरतेचा मंत्र सर्वत्र ऐकू यावा – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन    

ByMH LIVE NEWS

Feb 24, 2023
वीर बिरसा मुंडा यांच्या शूरतेचा मंत्र सर्वत्र ऐकू यावा – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन    

चंद्रपूर, दि. 24 : वीर बिरसा मुंडा यांचे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान आहे. शूरता आणि वीरतेचे प्रतिक म्हणजे बिरसा मुंडा होय. त्यांचे कार्य जनाजनाच्या मनामनापर्यंत पोहचावे, हाच उद्देश्य बिरसा मुंडा यांच्यावर आधारित नाटकामागे आहे. नाटकाच्या रुपाने वीर बिरसा मुंडा हे घराघरापर्यंत तर पोहोचतील परंतु त्यांची शूरता आणि वीरता यांचे अनुकरण करणेही गरजेचे आहे. वीर बिरसा मुंडा यांच्या जीवनगाथेच्या माध्यमातून सर्वांनी सकारात्मक शक्ती वाढवली पाहिजे, असे आवाहन राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

सांस्कृतिक विभागाच्यावतीने पोंभुर्णा (जि. चंद्रपूर) येथे आयोजित व अनिरुद्ध वनकर अभीनित क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्यावर आधारित धरती आबा क्रांतीसूर्य बिरसा मुंडाया नाटकाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर खासदार अशोक नेते, प्रकाश गेडाम, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले, माजी नगराध्यक्ष हरीश शर्मा, आशिष देवतळे, नगराध्यक्ष सुलभा पिपरे, उपाध्यक्ष अजित मंगळगिरीवार, नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष नंदू रणदिवे, आदिवासी मोर्चाचे प्रकाश गेडाम, अल्का आत्राम, धनराज कोवे, उपविभागीय अधिकारी ढवळे, गटविकास अधिकारी मरसकोल्हे, तहसीलदार कनवाडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी आशिष घोडे, अनिरुद्ध वनकर उपस्थित होते.

देशाचा सन्मान वाढविण्यासाठी जे जे काही समर्पित भावनेने देता येईल, ते ते देण्याचा संकल्प सर्वांनी करावा, असे आवाहन ना. मुनगंटीवार यांनी यानिमित्ताने केले. पोंभूर्णाच्या भूमिमध्ये मोठी शक्ती आहे. या गावाला ऐतिहासिक व आध्यात्मिक वारसा आहे. त्यामुळे वीर बिरसा मुंडा यांच्यावरील नाटक येथे होत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. आदिवासी बांधवांच्या विकासासाठी राज्य आणि केंद्र सरकार झटत आहे. पोंभूर्णाच्या एमआयडीसीत प्लग अँड प्लेअशा पद्धतीने अल्प भांडवलावर आधारित उद्योग उभारणीचे काम सुरू आहे. यापूर्वी मिशन शौर्यच्या माध्यमातून आपल्याला आदिवासी विद्यार्थ्यांना एव्हरेस्ट सर करण्यासाठी मदत करण्याची संधी प्राप्त झाल्याचा गौरवपूर्ण उल्लेख श्री. मुनगंटीवार यांनी केला.

चंद्रपुरातील आदिवासी तरुण-तरुणींसाठी स्किल डेव्हलपमेंटचे उपक्रम राबिवण्यात येत आहेत. बल्लारपूर ते चंद्रपूर मार्गावर एसएनडीटीच्या माध्यमातून भव्य प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येत आहे. येथे 62 अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. महाराष्ट्रातील सिम्बॉयसिसपेक्षाही दर्जेदार असे हे केंद्र राहणार असल्याचे श्री. मुनगंटीवार यांनी नमूद केले. चंद्रपूर जिल्ह्यात विमानतळ उपलब्ध आहे. फ्लाइंग क्लबच्या माध्यमातून येथे तरुण-तरुणींना प्रशिक्षण देण्याचा विचार आहे.

या उपक्रमात चंद्रपूर, गडचिरोलीतील आदिवासींना 50 टक्के आरक्षण देण्यात येणार असल्याची घोषणा श्री. मुनगंटीवार यांनी केली. देशगौरव पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी देशातील आदिवासी बांधवांचा नेहमीच गौरव केला आहे. देशाच्या सर्वोच्च पदावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू विराजमान आहेत. त्यामुळे आदिवासी समाजाची मान गौरवाने उंचावली आहे, असे श्री. मुनगंटीवार यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed