• Tue. Nov 26th, 2024

    कौशल्य विकास विभागाच्या रोजगार मेळाव्यात ७४५ उमेदवारांची नोकरीसाठी प्राथमिक निवड

    ByMH LIVE NEWS

    Feb 4, 2023
    कौशल्य विकास विभागाच्या रोजगार मेळाव्यात ७४५ उमेदवारांची नोकरीसाठी प्राथमिक निवड

    मुंबई, दि. 4 : कौशल्य विकास विभागाअंतर्गत असलेल्या मुंबई उपनगर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत गोरेगाव येथे आज झालेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात एकूण १ हजार ४१८ नोकरीइच्छुक उमेदवारांनी सहभाग घेतला. त्यातील ७४५ उमेदवारांची विविध नोकऱ्यांकरिता प्राथमिक निवड झाली असून १४४ उमेदवारांची विविध कंपन्यांनी त्यांच्याकडील विविध पदांसाठी अंतिम निवड केली. आज सकाळी राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या मेळाव्याचे उद्घाटन केले.

    मेळाव्यात विविध 41 उद्योग, आस्थापना तथा कंपन्यांनी सहभाग घेत त्यांच्याकडील 6 हजार 389 जागांसाठी आज मुलाखती घेतल्या. गोरेगावातील शहीद स्मृती क्रीडांगण येथे झालेल्या या मेळाव्यास आमदार विद्या ठाकूर, मेळाव्याचे समन्वयक प्रदीप दुर्गे, मुंबई उपनगर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त प्र. वा. खंडारे यांच्यासह नगरसेवक, विविध उद्योग, आस्थापनांचे प्रतिनिधी आणि नोकरीइच्छुक उमेदवार उपस्थित होते.

    राज्यात 300 पेक्षा अधिक रोजगार मेळावे – मंत्री मंगलप्रभात लोढा

    मंत्री श्री. लोढा यावेळी म्हणाले की, राज्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांना विविध कंपन्या, आस्थापनांमध्ये नोकरीची संधी मिळवून देण्यासाठी कौशल्य विकास विभागामार्फत राज्यात ठीकठिकाणी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत आहे. 300 पेक्षा जास्त मिळावे घेण्याचे नियोजन आहे. आज गोरेगाव येथे होत असलेल्या मेळाव्याला नोकरीइच्छुक उमेदवारांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अशाच पद्धतीने राज्याच्या सर्व भागात मेळाव्यांचे आयोजन करून प्रत्येक नोकरीइच्छुक उमेदवाराला रोजगार किंवा स्वयंरोजगार मिळवून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

    आजच्या मेळाव्यात विविध उद्योग, आस्थापनांनी सहभाग घेत त्यांच्याकडील रिक्त जागांसाठी मुलाखती घेतल्या. यामध्ये प्रामुख्याने सब्र रिक्रुटमेंट, डुआर्ज सर्विसेस. टेलीएक्सेस बीपीओ, अभिनव इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, वन स्टेप अवे एलएलपी, डायरेक्शन्स एचआर, श्री कन्सल्टन्सी, एसीइ टेक्नॉलॉजी, फन अँड जॉय अॅट वर्क, क्यूएचएसई इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, अंबिशस रिक्रुटमेंट, करिअर एन्ट्री, रिलायन्स निप्पॉन लाईफ इन्शुरन्स, पीपल ट्री, एनएसइ एम्पिरियल अकॅडमी, टाटा स्ट्राइव्ह, हिंदू रोजगार डॉट कॉम, भारती एअरटेल सर्व्हिसेस लिमिटेड, मनी क्रिएशन, युनि डिझाईन ज्वेलरी, थॉमस रिक्रुटमेंट सोल्युशन, टाटा एआयए लाइफ इन्शुरन्स, पावर एंटरप्राइजेस, इम्पेरेटिव्ह बिझनेस लिमिटेड, बझवर्क्स बिझनेस सर्विसेस, जीएस जॉब सोल्युशन, स्पॉटलाईट आणि आयुष्य हेल्थकेअर सर्व्हिसेस या कंपन्यांनी सहभाग घेत त्यांच्याकडील 6 हजार 389 इतक्या जागांसाठी मुलाखती घेतल्या. याचबरोबर राज्य शासनाची विविध आर्थिक विकास मंडळेही मेळाव्यात सहभागी झाली होती. त्यांनी उमेदवारांना त्यांच्याकडील स्वयंरोजगारविषयक विविध कर्ज योजनांची माहिती दिली.

    ००००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed