• Tue. Nov 26th, 2024

    महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात १३ हजार ५३९ कोटींचा निधी – रेल्वेमंत्री अश्व‍िनी वैष्णव – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Feb 3, 2023
    महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात १३ हजार ५३९ कोटींचा निधी – रेल्वेमंत्री अश्व‍िनी वैष्णव – महासंवाद

    नवी दिल्ली, 03 : केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या रेल्वे प्रकल्पांसाठी १३ हजार ५३९ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. राज्यातील १२३ रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येईल. यासह ‘बुलेट ट्रेन’ प्रकल्पासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यामुळे जमीन अधिग्रहणाच्या आवश्यक मंजुरीचे काम पूर्णत्वास गेले, असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज येथे दिली.

    येथील रेल भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रीय रेल्वेमंत्री श्री. वैष्णव बोलत होते. त्यांनी सांगितले, रेल्वेच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र हे एक महत्त्वाचे राज्य आहे. यावर्षी सादर केलेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी 13 हजार 539 कोटी रूपयांची भरीव तरतूद केली गेली आहे.

    महाराष्ट्रातील 123 रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण केले जाईल. याअंतर्गत निवड केलेल्या  रेल्वे स्थानकांमध्ये  मुलभूत तसेच अद्ययावत सुविधा पुरविण्यात येतील.  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या आधुनिकीकरणाच्या कंत्राटाचे काम मार्चपर्यंत पूर्ण होऊन त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरूवात होईल, अशी माहिती मंत्री श्री. वैष्णव यांनी दिली.

    ‘बुलेट ट्रेन’ रेल्वेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून यासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या सहकार्याने  जमीन अधिग्रहणाच्या आवश्यक मंजुरीचे काम पूर्ण झालेले आहे. मुंबई ते वापीपर्यंतच्या कामाचे कंत्राट दिले गेले आहे. बुलेट ट्रेनच्या मार्गावरील बांधणी सुरू झालेली आहे. ऑगस्ट 2026 पर्यंत बुलेट ट्रेन धावणार असल्याचेही मंत्री श्री. वैष्‍णव यांनी यावेळी सांगितले.

    अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त आणि सुविधापूर्ण असणाऱ्या ‘वंदे भारत’ रेल्वेची सुरूवात झालेली असून येत्या काळात अधिक संख्येने ‘वंदे भारत’ रेल्वे गाड‌्या धावतील. तसेच,  50 ते 100 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या दोन शहरांना जोडण्यासाठी, प्रादेशिक दळवळणाला अधिक गती देण्यासाठी ‘वंदे मेट्रो’ नावाने गाड‌्यांचे काम हाती घेतले असून ‘वंदे मेट्रो’ नजीकच्या शहरांना जोडणाऱ्या गाड्या पुढील काळात दिसतील. याशिवाय हायड्रोजन रेल्वे भविष्यात सुरू केली जाईल. सध्या जगातील दोन-तीन देशात हायड्रोजनवर चालणाऱ्या रेल्वे आहेत. भारतातही या दिशेने काम सुरू झाले असल्याची माहिती त्यांनी दिली.

    मागील वित्तीय वर्षात जवळपास 250 रेल्वे डब्यांचा दर्जा वाढलेला आहे. यावर्षी 300 रेल्वे गाड्यांचे जुने डबे बदलून राजधानी दर्जाचे केले जातील. यावर काम सुरू आहे. कवच (स्वंयचलित रेल्वे सुरक्षा प्रणाली) आहे.  या प्रणालीत 5 जी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल. कवच प्रणालीच्या वापराने अपघाताचे प्रमाण कमी होईल.  सध्या या प्रणाली अंतर्गत 4 हजार किलोमीटरचे काम सुरू आहे. येत्या वर्षभरात यात  पाच हजार किलोमीटरची भर पडणार असल्याची, माहिती श्री. वैष्णव यांनी यावेळी दिली.

    0000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed