नंदुरबार,दि.26 (जिमाका वृत्तसेवा): देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात जिल्ह्यातील क्रांतिकारकांचे योगदान अभूतपूर्व असे आहे. तसेच यंदाचे वर्ष हे स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्ष असून त्या निमित्ताने जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध उपक्रम राबविले जात असून ते भविष्यातही राबविण्याचे नियोजन असल्याची ग्वाही देत जिल्हावासीयांना ७३ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी दिल्या.
ते आज पोलीस कवायत मैदानावर आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य ध्वजारोहण प्रसंगी बालत होते. या सोहळ्याला जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रियाताई गावित, खासदार डॉ. हिनाताई गावित, जि.प उपाध्यक्ष सुहास नाईक, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी धनजंय निकम, जात पडताळणी समितीचे सहआयुक्त अर्जुन चिखले, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, पुलकीत सिंह,अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे आदी उपस्थित होते.
मंत्री डॉ. गावीत आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, आपल्या देशाला ब्रिटीश राजवटीपासून मुक्त करण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. त्यांच्या बलिदानामुळेच आपण १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्याचा सुर्य पाहु शकलो. स्वतंत्र भारताची धुरा सांभाळण्यासाठी कायदे-नियमांच्या चौकटीचे महत्व लक्षात घेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली घटना समितीची स्थापना करण्यात आली. या समितीच्या अथक परिश्रमातून आजच्या ७३ वर्षांपूर्वी म्हणजेच २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटना अंमलात आली आणि देशात लोकशाहीचे एक नवे पर्व सुरू झाले. या राज्यघटनेच्या माध्यमातून आपल्या देशाने जागतिक पातळीवर सार्वभौम, लोकशाही व प्रजासत्ताक देश म्हणून ओळख निर्माण केली आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे.
भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७३ वा वर्धापन दिन साजरा करतांना आपण या वर्षात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करीत आहोत. त्याच बरोबर मला आपल्याला सांगताना अभिमान वाटतो की, २०२३ हे वर्ष आपल्या नंदुरबार जिल्ह्याचे रौप्यमहोत्सवी वर्ष असून त्यासाठीही मी आपणांस शुभेच्छा देतो वयाने आणि आकाराने लहान असलेल्या आपल्या नंदुरबार जिल्ह्याने देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत निश्चितच गौरवशाली व सदैव स्मरणात राहील असे योगदान दिले आहे. स्वांतत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशात, राज्यात विविध उपक्रम राबविण्यात आले त्यात आपल्याही जिल्ह्यात जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषद व जिल्हा प्रशासनाच्या अधिपत्याखालील सर्व विभागांनी उपक्रम राबविले ते भविष्यातही राबवले जातील.
आपल्या जिल्ह्यात स्वयंस्फूर्तीने १८५७ च्या उठावामध्ये आपला सहभाग नोंदवून महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. त्यात क्रांतिकारक सुभात्या नाईक, रामजी नाईक, देवजी नाईक, ख्वाजा नाईक, भीमा नाईक, तंट्या नाईक यांसारख्या अनेक आदिवासी व क्रांतिकारकांनी अगदी प्राणपणाला लावून इंग्रजी सत्तेशी लढा दिला. पुढे १८५७ च्या उठावानंतर पुन्हा स्वातंत्र्यकार्यात जिल्ह्यातील नागरिकांना आणण्याचे कार्य अनेक बुद्धिजीवी समाजसुधारकांनी केले.
१९३८ च्या दरम्यान नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी संत श्री गुलाम महाराजांची आरती समाज / आपकी जय हो नावाची आगळी वेगळी चळवळ उभी राहिली. आदिवासी समाज हा प्रामाणिक, मेहनती असूनही केवळ अज्ञान, अंधश्रद्धा, व्यसनाधीनतेमुळे त्यात निर्माण झालेल्या अस्थिरतेची त्यांना जाणीव झाली. या सर्वातून ‘आप की जय हो’ ही स्वउद्धाराची चळवळ त्यांनी सुरू केली. दुर्गम भागातील लाखो आदिवासी बांधव या चळवळीच्या अहिंसा व सदाचरणाशी जोडले गेले. ही चळवळ तत्कालीन कोणत्याही प्रस्थापित नेत्याशिवाय असलेली व सामान्य जनतेमध्ये मान्यता पावलेली एकमेव अशी सुधारणावादी चळवळ होती.
गुलाम महाराजांच्या मृत्युनंतर त्यांचे धाकटे बंधू रामदास महाराजांनी त्यांच्या कार्याची धुरा सांभाळली. या दरम्यान देशातील स्वातंत्र्य लढयांचा संघर्षही अधिक जोर धरू लागला. येथील समाजजीवनात होणाऱ्या जागृतीवर व एकीवर ब्रिटीश सरकारचे बारकाईने लक्ष होते. त्यातूनच पुढे ‘आप’च्या एकत्र येणाऱ्या समुदायावर, आरती समारंभावर बंदी आणून सरकारने रामदास महाराजांवर हद्दपारीची कारवाई केली. त्यानंतर रामदास महाराज खेतिया मार्गाने मध्य प्रदेशात गेले. या वेळी ‘आप’ समाजाचा मोठा लोकसमूह त्यांच्या सोबत होता. ब्रिटिश सरकारने यातील सहभागी लोकांच्या जमिनी काढून दुसऱ्यांच्या नावावर केल्या. रामदास महाराज ‘आप’च्या ताफ्यासह बडवाणी, कुक्षी, विंध्यपर्वतातून नर्मदा नदी उतरून सातपुड्यात आले. अक्राणी महाल किल्ल्यातून तळोदा तालुक्यातील सातपुड्याच्या परिसरातील ‘रावला पाणी’ दरीत मुक्काम केला. तेव्हा ब्रिटिशांनी फलटणी पाठवून. ०२ मार्च, १९४३ दिवशी या ठिकाणाला वेढा घातला.
आदिवासी बांधवांच्या समूहावर ब्रिटीश सरकारने निर्दयीपणे गोळीबार केला. या गोळीबारात अनेक लोक शहीद झाले. देशकार्यासाठी मार्गक्रमण करणाऱ्या अनेक देशभक्तांचे ब्रिटीश सरकारने या वेळी प्राण घेतले. स्वातंत्र्यलढ्यातील या घटनेत केवळ गोळीबार झाला नाही, तर स्वातंत्र्य आंदोलनात सक्रिय असलेल्या व रामदास महाराजांना हद्दपारीच्या शिक्षेला विरोध करणाऱ्या ३४ आदिवासी शेतकऱ्यांच्या प्रत्येकी १६ एकर जमिनी ब्रिटीश सरकारने जप्त केल्या. रामदास महाराजांना अटक करून तुरुंगात टाकले. अशा प्रकारे सरकारने ‘आप की जय हो’ ही स्वांतत्र्य लढ्यांतील चळवळ शक्तीच्या बळावर दडपून टाकण्याचा प्रयत्न केला.
छोडो भारत आंदोलनामध्ये नंदूरबारमधील शाळकरी मुले आघाडीवर होती. हुतात्मा शिरिषकुमार मेहता, श्रीकृष्णभाई सोनी, मनसुबभाई, पी.के. पाटील, के.एल. शहा, लालदास शहा या बालवीरांचा त्यात समावेश होता. ९ सप्टेंबर १९४२ रोजी या आंदोलनाने तीव्र रूप धारण केले. या आंदोलनाची परिस्थिती आपल्या हाताबाहेर जातेय हे लक्षात येताच ब्रिटीश पोलीसांनी निःशस्त्र तरुणांवर गोळीबार करून क्रौर्याची सिमा गाठली. या गोळीबारात शहिद शिरिषकुमार, शहिद घनश्याम व शहिद लालदास हे हुतात्मा झाले. पोलीसांच्या गोळीबाराने भारतीयांसाठी पवित्र असलेल्या गोमातेसह क्रांतीकारक, बालके गोळी लागून कायमचे अपंग झाले.
स्वातंत्र्य लढ्यात तळोद्याच्या बारगळ गढीचे मोठे योगदान लाभले आहे. स्वातंत्र्य लढ्यसाठी अनेक क्रांतीकारकांनी आणि नेत्यांनी या गढीस पदस्पर्शाने पावन केले आहे, त्यात राजर्षी शाहु महाराज, अहिल्याबाई होळकर, लोकमान्य बाळगंगाधर टीळक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, गोंदवलेकर गुरूजी यांचा समावेश आहे.
१३ ऑगस्ट १९३० रोजी शहादा तालुक्यातील जयनगरच्या तसेच १३ ऑक्टोबर, १९३० रोजी फत्तेपूर आमोदे येथील दहा गावकऱ्यांनी याच दिवशी नांदरखेडे (नंदुरबार) येथील गावकरी, कुकावल तऱ्हाडी येथील दहा गावकऱ्यांनी आपआपल्या भागात सत्याग्रह केला. यावरून नंदुरबारच्या सर्वसामान्य जनतेपर्यंत स्वातंत्र्यचळवळीची ऊर्जा व जागृती मोठ्या प्रमाणात पोहचल्याचे दिसून येते. सन १९३० मध्ये महात्मा गांधींनी सुरू केलेल्या सविनय कायदेभंग चळवळीचे पडसाद हे नंदुरबार जिल्ह्यातही ठिकठिकाणी उमटले. त्यामुळे अनेक देशभक्तांना तुरुंगवास भोगावा लागला. त्यामध्ये नंदुरबार- ४०, नवापूर -१०, तळोदा-०७ आणि शहादा- १७५ क्रांतीकारकांना तुरुंगवास भोगावा लागला.
मुंबईमधील वारंवार होणाऱ्या बॉम्ब स्फोट घटनांपासून क्रांतिकारकांनी प्रेरणा घेऊन टोकरखेडा येथील क्रांतीकारक बारकू हिराजी पाटील, क्रांतीकारक विष्णू सीताराम पाटील यांच्यासोबत मुंबई येथील क्रांतीकारक अण्णासाहेब सहस्रबुद्धे यांच्याकडे दादरला गेले आणि त्यांच्याकडून क्रांतीकारक बारकू हिराजी पाटील यांनी बॉम्ब आणून नंदुरबारमध्ये २३ जानेवारी, १९४३ रोजी पहिला स्फोट नंदुरबारच्या पोलिस चौकीजवळ , २५ जानेवारी, १९४३ रोजी दुसरा स्फोट म्युनिसिपल शाळेच्या कंपाऊंडमध्ये करण्यात आला, तर शेवटचा तिसरा स्फोट १३ फेब्रुवारी, १९४३ रोजी रिपन ग्रंथालयाजवळ करण्यात आला. नंदुरबारमधील हे तिन्ही स्फोट यशस्वी झाले. त्यात कोणतीही मनुष्य वा जीवितहानी झाली नाही. त्यामुळे क्रांतिकारकांचा हेतू हा विध्वंस घडवून आणण्याचा नव्हता तर सामान्य जनतेचे गाऱ्हाणे सरकारपर्यंत पोहचविण्याचा होता व त्यासाठी जनता प्रत्यक्ष संघर्षालाही सज्ज झाली होती.
स्वातंत्र्य लढा दडपून टाकण्यासाठी ब्रिटीश सरकारने कधी अश्रुधूर, कधी लाठीमार तर कधी गोळीबार अशा दमननीतीचा वापर करून चळवळ दडपून टाकण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यातील नंदुरबार आणि तळोदा तालुक्यातील आदिवासी बांधवांवर सरकारने केलेला भयंकर गोळीबार जनता विसरू शकली नव्हती. गोळीबाराच्या या दोन्ही घटना अंगावर शहारे आणणाऱ्या होत्या. पहिल्या गोळीबारात ५ लहान शाळकरी मुले हुतात्मे झाले होते तर दुसऱ्या गोळीबारात १५ आदिवासी बांधव मृत्यूमुखी पावले आणि २८ लोक गंभीररीत्या जखमी झाले. अशा प्रकारे, तळोदा तालुक्यातील पोलिसांचा गोळीबार हा जालीयनवाला बागेच्या क्रूर घटनेची आठवण करून देणारा होता, असे इतिहासकार सांगतात.
नवापूर येथे १६ ऑगस्ट १९४२ रोजी सत्याग्रही आंदोलकांनी सरकारी बंधने धुडवून मिरवणुक काढली. या मिरवणुकीत क्रांतीकारक कन्हैयालाल शाह, कटालाल शाह, गमनलाल शाह, जयंतीलाल शाह, चंदुलाल शाह, नटवरला पुराणिक यांना सहा महिने सक्त मजुरीची व दंडाची शिक्षा आणि सुनावण्यात आली. छोडो भारत आंदोलनात सत्याग्रह केला. या आंदोलनात क्रांतीकारक धनसुखलाल दलाल, शांतीलाल शाह, नवनीतलाल कापडिया, हसमुखलाल शाह, राजेंद्र मोकाशी, धनसुखलाल शाह, गजेंद्र पाटील यांनी भाग घेतल्यामुळे त्यांना नऊ महिने सक्त मजुरीची शिक्षा आणि दंड करण्यात आला.
शहाद्यात देशभक्तांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेवून आपले जीवन पणाला लावले शहादा नगरपालिकेजवळील त्यांच्या सन्मानार्थ उभारलेला स्मृतीस्तंभ आजही आपल्याला प्रेरणा देतो. १८ सप्टेंबर १९४२ रोजी शहाद्यातील २९ पोलीस पाटीलांनी ब्रिटीश सरकारच्या जुलमी सत्तेचा निषेध म्हणून राजीनामा दिल्याचाही इतिहास आहे.
पारतंत्र्याच्या काळात या सर्व देशभक्तांनी परकीय सत्तेशी प्रखर संघर्ष केल्यामुळेच आपल्याला स्वातंत्र्याची पहाट पाहायला मिळाली. देशकार्यासाठी व मातृभूमीसाठी लढणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याची फलनिष्पत्ती म्हणजेच आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य आहे. त्यांच्या कार्याची व बलिदानाची आपण परतफेड करू शकत नाही, मात्र स्वातंत्र्याच्या या अमृतमहोत्सवी वर्षात त्यांच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण करून त्यांच्या आठवणी व कार्य आपण सतत स्मरणात ठेवू शकतो.
पालकमंत्र्याच्या हस्ते यांचा झाला सन्मान…
नंदुरबार जिल्ह्यात सशस्त्र सेना ध्वजदिन-2021 निधी संकलनासाठी दिलेल्या उद्दीष्टापेक्षा अधिक निधी संकलन केल्याबद्दल जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात निवड, इंडियन नॅशनल सायन्स कॉग्रेस,नागपूर व राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद मध्ये सहभाग घेतलेल्या वनवासी विद्यालय,चिंचपाडा येथील सोहम वसावे, राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात निवड झालेल्या अनुदानित आश्रम शाळा पांघरण येथील समिर गावित, राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात तृतिय क्रमांक मिळविल्या बद्दल मनस्वी चव्हाण, एकलव्य विद्यालय,नंदुरबार तर राष्ट्रीय प्रदर्शनात निवड झालेल्या शेख वसिफोद्दिन, ॲग्लो उर्दु हायस्कुल,नंदुरबार यांना पालकमंत्र्याच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले.
प्रजासत्ताक दिना निमित्त एस.ए.मिशन हायस्कुल व ज्यूनियर कॉलेज, नंदुरबार यांनी समूह नृत्य, एस.एस.मिशन इंग्लिश स्कुल, नंदुरबार यांनी समूह नृत्य, डॉ.काणे गर्ल्स हायस्कुल, नंदुरबार यांनी योगासने प्रात्यक्षिक नृत्य, एकलव्य विद्यालय,नंदुरबार यांनी स्वराज्याची शपथ, ॲग्लो उर्दु हायस्कुल व ज्युनियर कॉलेज, नंदुरबार यांचे कोरोना योध्यांना मानवंदन तसेच डी.आर.हायस्कुल, नंदुरबार यांनी देशभक्तीपर समृह नृत्य सादर केले.
यावेळी पोलीस विभागातील उत्कृष्ठ क्रिकेटर, तसेच धावपटू खेळाडू, पोलीस विभाग, रिझर्व प्लॉटून, दंगल नियत्रण पथक, खेळाडू पथक,गृहरक्षक दल, अग्नीशमक दल, के.डी.गावीत सैनिक स्कुल, पथराई, शासकीय आदिवासी इंग्रजी स्कुल, नंदुरबार, कमला नेहरु कन्या विद्यालय, नंदुरबार स्काऊट गाईड व श्रॉफ हायस्कुल विद्यार्थ्यांनी पालकमंत्र्यांना मानवंदना देऊन परेडचे संचलन केले.
यावेळी जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, उपजिल्हाधिकारी शाहुराज मोरे, नितीन सदगीर, कल्पना निळ-ठुंबे, पोलीस उपअधीक्षक विश्वास वळवी, उप विभागीय पोलस अधिकारी सचिन हिरे, जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी, तहसिलदार भाऊसाहेब थोरात, उल्हास देवरे, यांचेसह विविध विभागांचे अधिकारी, माध्यम प्रतिनिधी, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000000