२० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद होणार नाहीत. हिवाळी अधिवेशनात शालेय शिक्षण मंत्र्याचे स्पष्टीकरण
नांदेड -प्रतिनिधी
तांडा, वाडी, वस्त्या, या दुर्गम भागातील व गावातील जिल्हा परिषदेच्या २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा शासन विचार करत होते त्या अनुषंगाने एक पत्र देखील निघाले होते मात्र वेळीच या निर्णयाचे दुष्परिणाम लक्षात घेता एस. एफ. आय. – डी.वाय.एफ.आयया दोन्ही विद्यार्थी – युवक संघटनांनी महाराष्ट्रभर पालक, विद्यार्थी, युवक व नागरिकांना सोबत घेऊन राज्यभर वेगवेगळी आंदोलने केली तसेच सामाजिक माध्यमावर मोठ्या प्रमाणात जनजागृती करत ट्रेड चालवले. यामुळे संघटनांची आक्रमकता व आंदोलने व संघटनांनी केलेल्या जनजागृतीमुळे पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात या निर्णयाविरोधात संतापाची लाट तयार झाली. हे लक्षात घेता नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात शालेय शिक्षण मंत्री यांनी २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद होणार नाहीत. असे स्पष्टीकरण दिले. दरम्यान विधानसभेतील माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांनी ही हा निर्णय रद्द करण्यात यावा. यासाठी वारंवार विधानसभेत प्रश्न मांडला. सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशना दरम्यान एस. एफ. आय. – डी.वाय.एफ.आयच्या पदाधिकारी व शिष्टमंडळाने शालेय शिक्षण मंत्री यांची भेट घेऊन हा निर्णय रद्द करण्याची मागणी केली होती.
हा निर्णय रद्द करण्यात आल्यामुळे विद्यार्थी, पालक, व शिक्षणप्रेमी नागरिकांमधून निर्णय रद्द करण्यात महत्त्वाची भूमिका असलेल्या एस. एफ. आय. – डी.वाय.एफ.आय या दोन्ही संघटनांचे अभिनंदन व्यक्त करण्यात येत आहे .