पुणे, दि. १५ : पेरणे फाटा कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी येणाऱ्या अनुयायांना आवश्यक मूलभूत सुविधा देण्यात याव्यात, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.
विधानभवन येथे कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीला विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले, राज्यभरातून मोठ्या प्रमाणात अनुयायी येत असल्याने पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था करावी. पाणी पिण्यासाठी कागदी ग्लासची व्यवस्था करावी. अनुयायांची वाढती संख्या लक्षात घेता त्या प्रमाणात सुविधा निर्माण करण्यात याव्यात. (ग्रामीण मार्ग क्रमांक ४), राज्य मार्ग ११८ लोणीकंद ते डोंगरगाव रस्ता करणे ( ग्रामीण मार्ग क्रमांक ५), पुणे नगर रोड ते प्रजिमा २९ या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ६० लाख रुपये जिल्हा नियोजन समितीतून देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
सोहळा शांततेत आणि उत्साहात साजरा करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. सोहळ्याच्या नियोजनासाठी आवश्यक सर्व निधी शासनातर्फे देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाची पूर्वतयारी सुरू करण्यात आली असून विविध पातळ्यांवर बैठका घेण्यात आल्या आहेत. नियोजनाचा वेळोवेळी आढावा घेण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी दिली. कोविड नंतर यावर्षी मोठ्या प्रमाणात नागरिक येण्याची शक्यता लक्षात घेता १६ ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था करण्यात आले आहे. बसेस, १४०० तात्पुरती स्वच्छतागृहे, २० रुग्णवाहिका, आरोग्य पथके, पिण्याच्या पाण्याचे टँकर्स, अग्निशमन वाहने आदी व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
श्री. नारनवरे यांनी सोहळ्यासाठी करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली. सोहळ्यासाठी पोलीस विभागातर्फे आवश्यक बंदोबस्ताचे व वाहतूक विषयक नियोजन करण्यात येत असल्याचे श्री. कर्णिक यांनी सांगितले.
बैठकीला विविध शासकीय विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
000