मुंबई, दि. 15 – ‘प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप -2022’ मधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विविध विमा कंपन्यांच्या माध्यमातून 1 हजार 966 कोटी 63 लाख रुपयांची नुकसानभरपाई रक्कम शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आली आहे. तसेच प्रलंबित 447 कोटी रुपयांची नुकसान भरपाईची रक्कम तत्काळ वितरित करण्याचे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी पीक विमा कंपन्यांना दिले आहेत.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या आढाव्या संदर्भात आज मंत्रालयात कृषिमंत्री श्री. सत्तार यांनी बैठकीचे आयोजन केले होते, त्यावेळी ते बोलत होते. कृषि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषि आयुक्त सुनील चव्हाण, सहसचिव सरिता बांदेकर – देशमुख, कृषि आयुक्तालयाचे मुख्य सांख्यिकी अधिकारी विनयकुमार आवटे आदींसह विमा कंपन्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
स्थानिक नैसर्गिक आपत्ती, मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती, काढणी पश्चात नुकसान भरपाई यामध्ये शेतकऱ्यांकडून एकूण प्राप्त झालेल्या सूचना, सर्वेक्षण पूर्ण झालेल्या सूचना, नुकसानभरपाई लाभार्थी संख्या आणि निश्चित लाभार्थी संख्या याचा आढावा यावेळी मंत्री श्री.सत्तार यांनी घेतला. प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप-2022 अंतर्गत आतापर्यंत 57 लाख 91 हजार 167 इतकी निश्चित लाभार्थी संख्या आहे. त्यासाठीची निश्चित नुकसान भरपाई रक्कम 2 हजार 413 कोटी 69 लाख रुपये इतकी आहे. आतापर्यंत 43 लाख 86 हजार 763 शेतकऱ्यांना एकूण 1 हजार 966 कोटी 63 लाख रकमेचे वितरण शेतकऱ्यांना करण्यात आले आहे. उर्वरित नुकसानभरपाई रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ वर्ग करा. पीक विमा भरलेला एकही शेतकरी या लाभापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश मंत्री श्री.सत्तार यांनी विमा कंपन्यांना दिले.
यावेळी भारतीय कृषि विमा कंपनी, एचडीएफसी इर्गो, आयसीआयसीआय लोंबार्ड, युनायटेड इंडिया कंपनी आणि बजाज अलियान्झ या पाचही विमा कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
000
दीपक चव्हाण/विसंअ