• Sat. Nov 16th, 2024

    हरभरा पिकावरील घाटेअळीचे व्यवस्थापन

    ByMH LIVE NEWS

    Dec 15, 2022
    हरभरा पिकावरील घाटेअळीचे व्यवस्थापन

    सध्यस्थितीत ढगाळ वातावरण असल्यामुळे हरभरा पिकावरील घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. तसेच अंधारीरात्र असल्यामुळे घाटेअळीचे पतंग मोठ्या प्रमाणावर अंडी देऊ शकतात. या सर्व बाबी घाटेअळीस पोषक असल्यामुळे सध्या घाटेअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. बऱ्याच ठिकाणी या अळीने प्रादुर्भाव करण्यास सुरुवात केली आहे. हि कीड बहुभक्षी असून विशेषतः पीक फुलोरा आणि प्रामुख्याने घाटे अवस्थेत नुकसानकारक असते. लहान अळ्या सुरुवातीला कोवळी पाने, व फुले कुरतडुन खातात. घाटे लागल्यानंतर अळ्या घाटे कुरतडुन त्यास छिद्र पाडुन डोके आत खुपसुन आतील दाणे खातात. साधारणत: एक अळी तीस ते चाळीस घाट्यांचे नुकसान करु शकते. सध्या आढळणारी कीड ही अंडी अवस्था व प्रथम अवस्थेतील अळी अवस्था असल्यामुळे वेळीच उपाय योजना केल्यास कमी खर्चात किडींचे प्रभावी नियंत्रण होऊ शकते.

    एकात्मिक व्यवस्थापन :-

    • कोळपणी किंवा निंदणी करुन पीक तणविरहित ठेवावे तसेच घाटेअळीच्या मोठ्या अळ्या हाताने वेचून त्यांना नष्ट कराव्यात.
    • घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी ५ कामगंध सापळे प्रति हेक्टरी जमिनीपासुन १ मिटर उंचीवर लावावेत. कामगंध सापळ्यांमध्ये ८ते १० पतंग प्रति सापळा सतत २ ते ३ दिवस आढळल्यास किटकनाशकाची फवारणी करावी.
    • शेतामध्ये पक्षी बसण्यासाठी पिकाच्या किमान एक ते दोन फूट उंचीवर पक्षी थांबे हेक्टरी ५० ते ६० ठिकाणी उभारावेत. यामुळे पक्ष्यांना अळ्यांचे भक्षण करणे सोपे जाईल.
    • पिकाच्या सुरुवातीच्या काळात ५ टक्के निंबोळी अर्काची किंवा अझॅडिरेक्टिन ३०० पीपीम ५ मिली प्रति लिटर पाण्यातून प्रतिबंधात्मक फवारणी करावी.
    • घाटेअळी लहान अवस्थेत असताना एच.ए.एन.पी.व्ही. ५०० एल ई १ मिली प्रति लिटर पाण्यात ५ ग्रॅम निळ टाकून सायंकाळी फवारणी करावी.
    • जर किडींचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्यावर आढळून आल्यास इमामेक्टीन बेन्झोएट ५ एसजी ४.४ ग्रॅम किंवा फ्ल्युबेन्डामाईड ३९.३५ एससी २ मिली किंवा क्लोरॅनट्रीनीलीप्रोल १८.५ एससी २५ मिली यापैकी एका कीटकनाशकाची प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कीटकनाशकांचे प्रमाण नॅपसॅक पंपासाठी असून पेट्रोल पंपासाठी मात्रा तीनपट वापरावी.
    • शेतात कीटकनाशकाचे द्रावण तयार करताना व फवारणी करताना चष्मा, हातमोजे व तोंडावर मास्कचा वापर करावा. तसेच गुटखा, तंबाखूचे सेवन करु नये व बीडी ओढू नये.

    ०००

    माहितीः उपसंचालक (कृषी), कृषी आयुक्तालय पुणे,

    तांत्रिक माहिती: व.ना.म.कृ.वि.परभणी

    संकलनः जिमाका, अकोला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed