मुंबई, दि. 14 : जागतिक परिषदेच्या निमित्ताने जगभरातील प्रतिनिधी मुंबईत आले आहेत. जी – 20 परिषदेचा आज दुसरा दिवस होता. यानिमित्ताने सांताक्रूझ येथील ग्रॅन्ड हयात येथे महाराष्ट्राच्या हस्तकला उद्योगांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद लाभतो आहे.
महाराष्ट्र राज्य समूह विकास योजना तसेच उद्योग विभागाच्या इतर योजनेचा लाभ घेतलेले हे उद्योग आहेत. यावेळी प्रतिनिधींना औरंगाबादची हिमरू शाल भेट म्हणून प्रदान करण्यात आली. चार स्टॉलमध्ये सात कलांचे प्रदर्शन असून, पैठणी साडी, हिमरू शाल, बंजारा कलाकुसरच्या वस्तू, कोल्हापुरी चप्पल, हुपरी दागिने, सांगली-मीरजेची संगीत उपकरण तयार करणारे समूह, बिद्री कलाकुसर यांचा समावेश आहे.
प्राचीन कला आणि हस्त कलेवर आधारित कलाकृतींना प्रोत्साहन देण्यासाठी उद्योग विभागामार्फत विविध योजना राबविल्या जातात. या उद्योजकांना जागतिक पातळीवर ओळख मिळवून देण्यासाठी आयोजित केलेल्या प्रदर्शनात उद्योग विभागाने स्टॉल लावले आहेत. उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वात, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्या मार्गदर्शनात राज्याची गौरवशाली परंपरा जागतिक पातळीवर नेण्यासाठी या प्रदर्शनात उद्योग विभागाने स्टॉल उभारले आहे.
०००
अर्चना शंभरकर/विसंअ/