• Sat. Sep 21st, 2024

सर्वसामान्य रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळण्यासाठी आरोग्य यंत्रणेने सतर्क राहावे – केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Dec 2, 2022
सर्वसामान्य रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळण्यासाठी आरोग्य यंत्रणेने सतर्क राहावे – केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार – महासंवाद

कोल्हापूर, दि.2 (जिमाका):- केंद्र व राज्य शासनाकडून सर्वसामान्य नागरिकांसाठी आरोग्याच्या विविध योजना सुरु करण्यात आलेल्या आहेत. त्या सर्व योजनांची जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेमार्फत प्रभावीपणे अंमलबजावणी होत आहे. त्याप्रमाणेच देश क्षयरोग मुक्त करण्यासाठी व अशा रुग्णांची सेवा करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनी निक्षय मित्र योजनेत सहभाग घ्यावा, असे आवाहन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी केले.

येथील सीपीआर रुग्णालयात आयोजित जिल्ह्यातील आरोग्य योजनांच्या आढावा बैठकीत डॉ. पवार मार्गदर्शन करत होत्या. यावेळी खासदार धनंजय महाडिक, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक हुबेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, निवासी वैद्यकीय अधिकारी हर्षला वेदक व आरोग्य विभागाचे अन्य अधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार पुढे म्हणाल्या की, राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत जिल्ह्याला मागील वर्षी 85 कोटींचा निधी देण्यात आलेला होता तर यावर्षी 90 कोटीचा निधी मंजूर आहे. राज्याच्या मागणीप्रमाणे केंद्र शासन जिल्ह्यात आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सदरचा निधी मंजूर करत असते तरी या अंतर्गत आरोग्य सुविधांचा लाभ ग्रामीण भागातील रुग्णापर्यंत पोहोचवावा, असे त्यांनी सूचित केले.

आरएसबीके अंतर्गत जिल्ह्यात जवळपास अडीच हजार शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत. स्क्रीनिंग अंतर्गत 150 रुग्णांच्या हृदयाशी संबंधित शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन होते. त्यापैकी 148 रुग्णांच्या यशस्वी हृदय शस्त्रक्रिया करण्यात आरोग्य यंत्रणा यशस्वी झाली असून हे एक चांगले यश आहे. तसेच प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत 48 कोटीचा निधी लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आलेला आहे. या दोन्ही योजनेत जिल्ह्याची कामगिरी चांगली आहे, असे डॉ. पवार यांनी सांगून आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत जिल्ह्यात जवळपास 7 लाख लाभार्थी असून 62 रुग्णालयातून पात्र रुग्णांना उपचार उपलब्ध करून दिले जात आहेत. तरीही या योजनेचा लाभ जास्तीत-जास्त लाभार्थ्यांनी घेण्यासाठी आरोग्य यंत्रणेने प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सूचित केले.

कोरोना काळानंतर टेली कन्सल्टिंग योजनेचा लाभ जिल्ह्यातील 78 हजार रुग्णांनी घेतला आहे, ही समाधानकारक बाब असून या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गावातील रुग्णांनी आरोग्य सुविधांचा लाभ घेणे गरजेचे असल्याचे मत डॉ. पवार यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच केंद्र शासनाकडून पंधरावा वित्त आयोगांतर्गत जिल्ह्यात आरोग्य सुविधा उभारण्यासाठी 20 कोटीचा निधी मंजूर केलेला असून त्या अंतर्गत जिल्ह्यात पायाभूत सुविधा उभाराव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.

जिल्ह्यात सध्या दोन डायलिसिस सेंटर कार्यरत असून पुढील काळात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी डायलिसिस सेंटरची सुविधा उभारण्यासाठी आरोग्य यंत्रणांनी प्रयत्न करावेत. तसेच ग्रामीण भागातील रुग्णांना अद्ययावत सोयी सुविधा मिळण्यासाठी ज्या रुग्णालयात सोनोग्राफी मशिनरीची सुविधा उपलब्ध आहे त्या ठिकाणी आठवड्यातून किमान एक वेळ तरी डॉक्टरची सेवा तिथे उपलब्ध झाली पाहिजे, यासाठी योग्य ती दक्षता घ्यावी, अशा सूचना डॉक्टर पवार यांनी दिल्या.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विविध सोयी सुविधांची माहिती घेऊन या रुग्णालयामार्फत जास्तीत जास्त अद्ययावत आरोग्य सुविधा रुग्णांना मिळण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच या रुग्णालयाच्या अद्ययावतीकरणासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करुन दिला जाईल असे डॉक्टर पवार यांनी सांगितले.

खासदार धनंजय महाडिक यांनी निक्षय मित्र योजनेअंतर्गत जिल्ह्यातील संमती दिलेल्या 1 हजार 703 क्षय रुग्णांपैकी 500 रुग्णांचे पालकत्व घेतले, त्याबद्दल केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. एकूण 656 क्षय रुग्ण विविध संस्था व व्यक्तींनी दत्तक घेतलेले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 2 हजार 54 क्षयरुग्ण आहेत. तसेच उर्वरित रुग्णांचे पालकत्व घेण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनी मानवी दृष्टिकोनातून पुढे यावे, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.

प्रारंभी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक यांनी जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत राबविण्यात येत असलेल्या आरोग्य योजनांची सविस्तर माहितीचे सादरीकरण केले.

000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed