मुंबई, दि. 30 : ज्येष्ठ साहित्यिक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तसेच मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु प्राध्यापक नागनाथ कोतापल्ले यांच्या निधनाने अभिजात लेखणी शांत झाली आहे, या शब्दांत सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
श्री. मुनगंटीवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, कविता, कथा, दीर्घकथा, कादंबरी, ललित गद्य आणि समीक्षा या साहित्यप्रकारांमध्ये मुशाफिरी करणाऱ्या प्रा. कोतापल्ले यांनी आपल्या लेखनातून समाजाला दिशा देत नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली. साहित्यिक म्हणून ते जितके परिचित होते तितकाच त्यांनी कुलगुरु पदावर आपला ठसा उमटवला. एक अध्यापनकुशल आणि विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणूनही ते प्रसिद्ध होते. मराठी ग्रामीण साहित्यात त्यांचे योगदान मोठे होते. महात्मा फुले यांच्या जीवनावरील डॉ. कोतापल्ले यांचा ‘ज्योतीपर्व’ हा ग्रंथ सामाजिक आणि परिवर्तनवादी विचारांची साक्ष देतो. कुलगुरु असताना ‘कॉपीमुक्त विद्यापीठ अभियान’ राबविण्यात त्यांचा मोठा वाटा होता. राज्य सरकारच्या मराठी राजभाषा धोरण विषयक समितीवर काम करताना त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. प्रा. कोतापल्ले यांच्या निधनाने साहित्य आणि शिक्षणक्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. ईश्वर प्रा.नागनाथ कोतापल्ले यांना सद्गती देवो. कोतापल्ले कुटुंबियांच्या दु:खात आपण सहभागी असून हे दु:ख सहन करण्याची ताकद त्यांच्या कुटुंबियांना मिळो, असे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.
००००
वर्षा आंधळे/विसंअ/