• Mon. Nov 25th, 2024

    डॉ. कांता नलावडे साहित्य क्षेत्रातही भरारी घेतील – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

    ByMH LIVE NEWS

    Nov 26, 2022
    डॉ. कांता नलावडे साहित्य क्षेत्रातही भरारी घेतील – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

    मुंबई, दि.26 : भाजपच्या विविध राष्ट्रीय पदांवर आणि नंतर आमदार असताना आपल्या भाषणातून, आपल्या कार्यातून लोकांमध्ये ओळख निर्माण करणाऱ्या डॉ. कांता नलावडे या येणाऱ्या काळात साहित्य क्षेत्रातही भरारी घेतील, असा विश्वास सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. राजकारण क्षणभंगुर तर साहित्य शाश्वत असते, असेही ते म्हणाले.

    माजी आमदार डॉ. कांताताई नलावडे यांच्या “भरारी” कवितासंग्रहाचे प्रकाशन आज रवींद्र नाट्य मंदिर येथे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, ज्येष्ठ रंगकर्मी पद्मश्री वामन केंद्रे, ज्येष्ठ लेखक डॉ.शिरीष देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले.

    यावेळी श्री. मुनगंटीवार म्हणाले की, अनेकदा कथासंग्रह, कादंबरी यांना अनेक प्रकाशन संस्था मिळतात. काव्यसंग्रह प्रकाशित करण्यास ग्रंथाली प्रकाशन संस्थेने नफा तोट्याचा विचार न करता काव्यसंग्रह प्रकाशित केला, याचे कौतुक वाटते. मला विश्वास वाटतो की, कांता नलावडे यांचे 25 वे पुस्तकही प्रकाशन करण्याचे भाग्य मला मिळेल.

    राजकरणात सक्रिय असताना कांता नलावडे या कार्यकर्त्या म्हणून आम्हाला माहित होत्या पण आता त्या कवयित्री म्हणून आपल्यासमोर आल्या असून ही त्यांची नवी ओळख सुद्धा आनंदाची वाटते. मला आनंद वाटतो की, कांताताई यांना माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा सहवास मिळाला आणि त्यामुळे त्यांची कवितांची ओळख अधिक गडद झाली, असेही श्री. मुनगंटीवार यावेळी म्हणाले.

    हजारो शब्दांचा आशय कवितेच्या दोन ओळीतून व्यक्त होतो ही कवितेची ताकद आहे, असे सांगून श्री. मुनगंटीवार पुढे म्हणाले की, “कविता” म्हणजे शब्दांतून व्यक्त होणाऱ्या तुमच्या भावना असतात. आपल्या भावना नेमक्या शब्दात मांडणे हे प्रत्येकाला जमतेच असे नाही. व्यक्त होणं ही एक प्रक्रिया आहे. व्यक्त होणारी माणसं सशक्त असतात. कांताताई यांच्याकडे कलेचे बीज आहे आणि त्यामुळे त्यांनी आपल्या 45 कवितांमधून आपला साहित्याचा ठसा उमटवला असल्याचे श्री. मुनगंटीवार यावेळी म्हणाले.

    पद्मश्री श्री. केंद्रे म्हणाले की, नेता आणि अभिनेता जमिनीशी बांधलेला हवा, तसेच लेखक आणि कवी यांना संवेदनशील मन हवे, तरच आपण चांगले लिहू शकतो. कांताताई राजकारणात असताना त्यांनी व्हॉईस कल्चर केले, कारण त्यांना आवाजावर पकड हवी होती. अभ्यासक्रम शिकत असताना त्या उत्कृष्ट विद्यार्थिनी होत्या. चांगले बोलण्यासाठी आधी ऐकायला शिकले पाहिजे हा दिलेला मंत्र त्यांनी पाळला. कला, साहित्य, संगीत, सिनेमा, नाटक ही माध्यमे आपल्यात कला रुजविण्याचे काम करते; आणि ही माध्यमे मन गुंतवून ठेवत असल्याने आपण मानसिकदृष्ट्या चांगले राहतो.

    डॉ. देशपांडे यावेळी म्हणाले की, कांता नलावडे या विद्वान आणि प्रतिभावान आहेत. माझी विद्यार्थिनी म्हणून मला तिच्या भरारीचे कौतुक वाटते. आमदार म्हणून काम करताना जसे तिने विविध प्रश्न मार्गी लावण्यात पुढाकार घेतला तसे कवयित्री म्हणून तिने आपल्या लेखणीतून समाजातील परिस्थितीवर लिहिले आहे. कांता नलावडे यांनी प्रकाशनापूर्वी आपल्या कवितासंग्रहात माहिती दिली.

    कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री. मुनगंटीवार यांनी संविधान दिवसाच्या उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. 26/11 च्या भ्याड आतंकवादी हल्ल्यात वीरगतीस प्राप्त जवानांना आणि निष्पाप नागरिकांना विनम्र श्रद्धांजली आणि ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

    ०००

    वर्षा आंधळे/विसंअ

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *