मुंबई, दि. 26 : शाहिर विठ्ठल उमप यांनी आपल्या शाहिरीतून समाजात निर्माण केलेली ऊर्जा जगातील कुठलीही औषध कंपनी निर्माण करू शकत नाही, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
12 व्या शाहिर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोहाच्या वेळी मृद्गंध पुरस्कार 2022 चे वितरण करतांना ते बोलत होते.
यावेळी आमदार आशीष शेलार, ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, पद्मभूषण उस्ताद राशीदजी खॉं, पराग लागू, नंदेश उमप मंचावर उपस्थित होते.
मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात पार पडलेल्या या कार्यक्रमात फ.मुं. शिंदेजी, रवींद्र साठे, डॉ.रवींद्र कोल्हे,डॉ.स्मीता कोल्हे, संजय मोने,सुकन्या मोने, कमलाबाई शिंदे, श्रेया बुगडे यांना मृद्गंध पुरस्काराने सन्मानित केले गेले.
यावेळी बोलतांनाश्री. मुनगंटीवार म्हणाले की,आज ज्यांना मृद्गंध पुरस्कार दिला गेलाय त्या सर्व व्यक्ती कर्तृत्वाने हिमालयाएवढ्या मोठ्या आहेत. त्यांना पुरस्कार द्यायला मिळणे हाच माझ्याकरता एक मोठा पुरस्कार आहे. इथे या सर्व लोकांच्या मनोगतातून, गायनातून या कार्यक्रमाची उंचीही प्रचंड वाढली आहे. राजकारणात तीरस्कारालाही तोंड द्यावे लागते मात्र या मंचावर येऊन जो आनंद मिळाला तो अवर्णनीय आहे.