कोल्हापूर, दि.25 (जिमाका) : पर्यावरण रक्षण ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. कण्हेरी मठ येथील ‘पंचभौतिक महोत्सव’ यशस्वी होण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही देऊन पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारा हा महोत्सव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थानच्या वतीने आयोजित सुमंगलम पंचभौतिक महोत्सव 22 ते 26 फेब्रुवारी 2023 दरम्यान कण्हेरी मठ, कोल्हापूर येथे होणार आहे. या महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण व पंचगंगा नदीची आरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली, या महोत्सवात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, सिद्धगिरी मठाचे काडसिद्धेश्वर स्वामीजी, खासदार धनंजय महाडिक, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आबीटकर, आमदार महेश शिंदे, माजी आमदार चंद्रदीप नरके, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पंचगंगा नदीची आरती व त्यानंतर बोध चिन्हाचे अनावरण करण्यात आले.
पंचगंगेची आरती करण्याचं सौभाग्य मिळालं, हा आजवरचा सर्वाधिक समाधान देणारा कार्यक्रम आहे, असे गौरवद्गार काढून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पर्यावरणाचा ऱ्हास रोखून वैश्विक समतोल राखण्याची प्रत्येकाची बांधिलकी आहे. पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी आयोजित ‘पंचभौतिक महोत्सवामुळे’ कोल्हापूरसह राज्याची मान उंचावेल. या महोत्सवाची ख्याती आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्यासाठी कोणतीही कमतरता भासणार नाही. या महोत्सवात राज्य शासनाचा पर्यावरण विभाग, कृषी, आरोग्य, उच्च व तंत्र शिक्षण, शालेय शिक्षण, ग्रामविकास, सांस्कृतिक कार्य विभागासह लोकप्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्था व अन्य सर्व घटक एकत्र येऊन या महोत्सवाची नोंद जागतिक पातळीवर होण्यासाठी प्रयत्न करुया, असे आवाहन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले.
आजवर अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवून सिद्धगिरी मठाने शैक्षणिक, सामाजिक, कृषी, आरोग्य, महिला सक्षमीकरण, युवा, ग्राम विकास क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या पंचभौतिक महोत्सवाला सर्व सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी यावेळी दिले.
पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कोल्हापूरचं घट्ट नातं आहे. गरिबांच्या हाकेला धावणारे म्हणून ओळख असणारे मुख्यमंत्री शिंदे हे 2019 च्या महापुरामध्ये कोल्हापुरातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी झटले होते. कोल्हापूरच्या विकासासाठी ते प्रयत्नशील असून येथील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी शंभर कोटींचा निधी त्यांनी तत्काळ दिला आहे. कोल्हापूरकरांची प्रत्येक गरज पूर्ण करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे, असे सांगून ते म्हणाले, येत्या दोन महिन्यांत पंचगंगा घाटाचे सुशोभीकरण करण्यावर भर दिला जाईल. पंचगंगेची दररोज आरती, भवानी मंडपातील शासकीय कार्यालयांचे स्थलांतर करुन भाविकांसाठी सुविधा निर्माण करणे, तीर्थक्षेत्र विकास आदी कामे करुन कोल्हापूरचा विकास साधला जाईल.
काडसिद्धेश्वर महाराज यांनी पंचभौतिक सोहळ्याविषयी माहिती दिली. साधारण 500 एकर जागेमध्ये होणाऱ्या या उत्सवामध्ये जगभरातून विविध क्षेत्रातील मान्यवर व सुमारे 30 लाख नागरिक उपस्थित राहतील. या कार्यक्रमाचे परिषद, प्रदर्शन व प्रवर्तन असे स्वरुप असेल. वैश्विक पर्यावरण संवर्धनासाठी या उत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
पंचगंगेच्या आरती दरम्यान लावण्यात आलेल्या दिव्यांच्या लख्ख उजेडाने पंचगंगा घाट परिसर उजळून गेला. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संदीप पाटील यांनी केले तर चारुदत्त जोशी यांनी सूत्रसंचालन केले. संस्थानचे विश्वस्त उदय सावंत यांनी आभार मानले.
****