मुंबई, दि. २५ : उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा येथील उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्यात आले आहे. सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या विशेष प्रयत्नांमुळे राज्य शासनाने श्रेणीवर्धन करण्यास मान्यता दिली आहे. याबद्दल मंत्री श्री. सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
श्रेणीवर्धन केल्यामुळे परांडा येथील उपजिल्हा रुग्णालयात आता ५० ऐवजी १०० खाटा उपलब्ध असतील. यामुळे या भागातील जास्तीत जास्त नागरिकांना आरोग्यविषयक सेवा उपलब्ध करुन देणे शक्य होणार आहे, असे श्री. सावंत यांनी सांगितले.
याचबरोबर वाशी आणि भूम या दोन्ही ठिकाणी असलेल्या ग्रामीण रुग्णालयांचे श्रेणीवर्धन करण्यात आले आहे. या दोन्ही ठिकाणी ३० ऐवजी आता ५० खाटा उपलब्ध असतील. या तीनही रुग्णालयांच्या श्रेणीवर्धनाबाबतचे शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत.
0000
रवींद्र राऊत/विसंअ