• Wed. Nov 27th, 2024

    कालव्यांशेजारील विहिरींना पाणीपट्टी माफ करण्याचा प्रस्ताव कृष्णा खोरे विकास महामंडळाने शासनाकडे पाठवावा – पालकमंत्री – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Nov 25, 2022
    कालव्यांशेजारील विहिरींना पाणीपट्टी माफ करण्याचा प्रस्ताव कृष्णा खोरे विकास महामंडळाने शासनाकडे पाठवावा – पालकमंत्री – महासंवाद

    पुणे, दि. २५: कालव्यांच्या शेजारील विहिरींना पाणीपट्टी माफ करण्याचा प्रस्ताव कृष्णा खोरे विकास महामंडळाने शासनाकडे पाठवावा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कालवे सल्लागार समितीच्या बैठकीत  दिले.

    पुणे जिल्ह्यातील नीरा उजवा कालवा, नीरा डावा कालवा, खडकवासला, भामा आसखेड, पवना व चासकमान प्रकल्पांची कालवे सल्लागार समिती बैठक पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.  बैठकीस विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह पुणे, सोलापूर व सातारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

    सन २००९ पर्यंत कालव्यांशेजारील विहीरींना पाणीपट्टी आकारण्याची तरतूद होती. मध्यंतरी ती बंद करण्यात आली होती. आता पुन्हा २०२२ पासून पाणीपट्टी आकारण्याचे महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाचे आदेश आहेत. त्यामुळे पुर्वीची व्याजासह थकबाकीची रक्कम आणि यापुढे होणारी आकारणी अशी सर्व रक्कम शेतकऱ्यांचे हीत लक्षात घेऊन माफ करण्याबाबत शासनस्तरावर सकारात्मक प्रयत्न केले जातील. तसा प्रस्ताव महामंडळाने शासनाकडे पाठवावा, असे निर्देश पालकमंत्री श्री. पाटील यांनी दिले.

    पुणे महानगर पालिकेने पाणीपुरवठ्यातून होणारा ३५ टक्के इतका अपव्यय रोखल्यास मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होईल, त्यासाठी महानगरपालिकेने २४ बाय ७ समान पाणीपुरवठा योजना गतीने पूर्ण करावी, जायका प्रकल्प गतीने पूर्ण करावा, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.

    बैठकांना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हनुमंत गुणाले, अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, अधीक्षक अभियंता संजीव चोपडे, पुणे तसेच पिंपरी- चिंचवड महानगर पालिकेचे अधिकारी, पाटबंधार विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

    नीरा उजवा व डावा कालव्याची रब्बीची दोन आवर्तने

    जिल्ह्यातील सर्व धरणप्रकल्पांमध्ये सध्या जवळपास शंभर टक्के पाणीसाठा आहे. भाटघर, वीर, गुंजवणी व नीरा देवघर मध्ये ४८ टीएमसी पाणीसाठा आहे. नीरा उजवा कालव्यातून २७ टीएमसी आणि नीरा डावा कालव्यातून १५.२५ टीएमसी पाणीवापर मंजूर आहे. सिंचन, पिण्यासाठी व औद्योगिक वापरासाठी मंजूर पाणीवापरानुसार मुबलक पाणी उपलब्ध असून नीरा उजवा कालवा आणि नीरा डावा कालव्यातून रब्बी हंगामात दोन आणि उन्हाळी हंगामात दोन आवर्तने देण्यात येणार आहेत. रब्बी हंगामातील पहिले आवर्तन २२ नोव्हेंबर पासून सुरू करण्यात आले आहे. पहिले आवर्तन १४ जानेवारी पर्यंत पूर्ण करुन दुसरे आवर्तन १५ जानेवारीपासून सोडण्याचे नियोजन असून त्यास पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखालील कालवा सल्लागार समितीने मान्यता दिली.

    या बैठकीस खासदार रणजीतसिंह मोहिते पाटील, माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे, आमदार समाधान आवताडे, दीपक साळुंखे, दीपक चव्हाण, राम सातपुते आदी उपस्थित होते.

    खडकवासला प्रकल्पातून रब्बी व उन्हाळी अशी मिळून तीन आवर्तने

    खडकवासला प्रकल्पात सध्या २७.३८ टीएमसी पाणीसाठा असून साठ्याची टक्केवारी ९३.९२ टक्के आहे. लाभक्षेत्रातील १८ तलावांमध्ये धरणाचे पाणी सोडून व कार्यक्षेत्रात झालेल्या पावसामुळे हे सर्व तलाव १०० टक्के भरण्यात आले आहेत.

    पुणे महानगरपालिकेने अतिरिक्त पाणीवापर टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना हाती घ्याव्यात अशी मागणी लोकप्रतीनिधींनी यावेळी केली. पिण्यासाठी, ग्रामीण भागातील सिंचनासाठी तसेच औद्योगिक वापरासाठी पाणीवापराबाबत समतोल राखण्यासाठी प्रयत्न करावेत. महानगरपालिका आणि जलसंपदा विभागाने एकत्र बैठक घेऊन अतिरिक्त पाणीवापराचा प्रश्न सोडवण्याबाबत विचारविनिमय करावा, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. पाटील यांनी केल्या.

    सध्या पाणीपरिस्थिती पाहता खडकवासला प्रकल्पातून नवा मुठा उजवा कालव्याला २२ डिसेंबर रोजी रब्बीचे अवर्तन सोडण्याचे नियोजन असून रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी योग्य नियोजन करुन दोन ऐवजी एकूण तीन आवर्तने सोडण्यात यावे, अशा सूचना श्री. पाटील यांनी दिल्या.

    बैठकीस आमदार सर्वश्री राहूल कुल, सुनील शेळके, भीमराव तापकीर, चेतन तुपे, दिलीप मोहिते पाटील, अशोक पवार आदी उपस्थित होते.

    पवना धरणात सध्या ७.६७ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असून ते पिण्यासाठी, सिंचन तसेच औद्योगिक वापरासाठी पुरेसे आहे. रब्बी व उन्हाळी हंगामासाठी १५ जुलैपर्यंतचा पाणीवार गृहीत धरता पाण्याचे योग्य नियोजन करण्यात आले आहे, असे बैठकीत सांगण्यात आले. भामा आसखेड धरणात पुरेसे पाणी असून धरणातून २ वेळा नदी पाणी सोडण्याचे ठरले. धरणाचे पाणी प्राधान्याने खेड तालुक्याला देण्याबाबत विचार करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. चासकमान प्रकल्पातून रब्बी हंगामात २२ डिसेंबर रोजी आवर्तन सोडण्याचे बैठकीत ठरले.

    बैठकीस खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, राहुल कुल, भीमराव तापकीर, दिलीप मोहिते पाटील, अशोक पवार, चेतन तुपे आदी उपस्थित होते.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed