• Thu. Nov 28th, 2024

    विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि आत्मगौरव वाढवणारे शिक्षण द्यावे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

    ByMH LIVE NEWS

    Nov 11, 2022
    विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि आत्मगौरव वाढवणारे शिक्षण द्यावे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

    मुंबई, दि. 11 : शिक्षण आणि शैक्षणिक गुणवत्ता ही देशाची आणि राज्याची ओळख असते. विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुरूप शिक्षणाबरोबरच त्यांचा आत्मविश्वास आणि आत्मगौरव वाढवणारे आणि त्यांना प्रगल्भ करणारे समाजोपयोगी शिक्षण दिले पाहिजे, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

    मुंबई विद्यापीठ येथे राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान (रुसा) आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राष्ट्रीय मूल्यांकन आणि मानांकन’ या विषयावरील एकदिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

    या परिषदेला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, नॅकचे चेअरमन भूषण पटवर्धन, मुंबई विद्यापीठाचे प्र.कुलगुरू अजय भामरे, रुसाचे संचालक निपुण विनायक, उच्च शिक्षण संचालक धनराज माने, प्र कुलगुरू दिगंबर  शिर्के, प्र.कुलसचिव शैलेंद्र देवळाणकर, विभागप्रमुख, प्राध्यापक आणि मान्यवर उपस्थित होते.

    मंत्री श्री. पाटील म्हणाले, राज्यातील महाविद्यालयांनी नॅक मुल्यांकन करून घेणे गरजेचे आहे. नॅक मूल्यांकन करण्यासाठी महाविद्यालयाच्या काही अडचणी असल्यास त्यासाठी शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल. परंतु नॅक मूल्यांकनामध्ये मागे राहू नये, नॅक मूल्यांकन ऐच्छिक नसून ती एक अनिवार्य बाब आहे हे लक्षात घेऊन महाविद्यालयांनी मूल्यांकन प्रक्रिया लवकर सुरू करावी,असे आवाहनही मंत्री श्री. पाटील यांनी केले.

    प्राध्यापक भरती प्रक्रिया सुरू करण्यात येत असून 2 हजार 88 पदे भरण्यास मंजुरी देण्यात आली आहे. याबाबची रोस्टर प्रक्रिया वेळेत पूर्ण करून उर्वरित पद भरती बाबतही  आढावा घेऊन टप्याटप्यांनी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येईल.  या भरती प्रक्रियेबाबत शासन सकारात्मक असल्याचे  मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

    नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये शिक्षण मातृभाषेत असावे याला अधिक महत्त्व देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी विखुरलेल्या उच्च व तंत्र शिक्षण संस्थापासून बहूशाखीय विद्यापीठांची रचना ही काळाची गरज आहे. नवीन शैक्षणिक बदल स्वीकारून विद्यार्थांना अत्याधुनिक सुविधा देऊन प्रगत अभ्यासक्रमाच्या साहाय्याने  प्रशिक्षण,संशोधन,आणि समुदायाप्रती प्रतिबध्दता हे शिक्षण संस्थांचे स्वरूप असले पाहिजे तर त्यातून राष्ट्रविकास आणि विद्यार्थीहित नक्कीच जोपासले जाईल असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

    श्री. पटवर्धन म्हणाले, महाराष्ट्र शिक्षणात अग्रेसर असलेले राज्य आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षणक्षेत्रात बदल केला पाहिजे.  शिक्षणाचा मूळ उद्देश काय आहे यानुसार दर्जेदार शिक्षण दिले पाहिजे.

    नॅक मूल्यांकन हे शैक्षणिक संस्थांचे दिनदर्शिका आणि सतत अंतर्गत मूल्यमापनाच्या आचरणासह सुनियोजित आणि नॅक मूल्यांकन करणे ही तपासणी नाही तर दर्जा आणि गुणवत्ता सुधारण्याची संधी आहे असे समजून कार्य केले पाहिजे. याबाबत लवकरच ‘वन नेशन वन डेटा’ प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे असेही श्री. पटवर्धन यांनी सांगितले.

    श्री. रस्तोगी म्हणाले, आजची परिषद ही  नॅक मूल्यांकन प्रक्रियेसाठी महाविद्यालय आणि विद्यापीठाने काय केले पाहिजे याबाबत  मार्गदर्शन करणारी एक दिवसीय परिषद असून महाविद्यालयाने वेळेमध्ये नॅक  मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण करावी. विद्यापीठांनी गुणवत्तेवर भर देऊन कुशल मनुष्यबळ उपलब्ध होईल असे शिक्षण दिले पाहिजे. वाढत्या उद्योग क्षेत्राचा अभ्यास करून नवीन नवीन अभ्यासक्रम विकसित केले पाहिजे. पुढील दहा वर्षाचे शैक्षणिक आव्हान लक्षात घेऊन शिक्षण पद्धतीत सुधारणा करावी आणि दर्जेदार शिक्षण पद्धतीचा अवलंब करावा असेही त्यांनी सांगितले.

    ००००

    काशिबाई थोरात/विसंअ/11.11.2022

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed