• Wed. Nov 27th, 2024

    लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी युवकांनी पुढे यावे- मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार

    ByMH LIVE NEWS

    Nov 9, 2022
    लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी युवकांनी पुढे यावे- मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार

    युवा मतदार नोंदणी मोहीम लोकचळवळ व्हावी – अनुपचंद्र पांडे

    पुणे, दि. ९ : जगात लोकशाहीचा विकास होत आहे; देशांची प्रगती होत आहे. अनेक समस्या असल्या तरी त्या सोडवण्यासाठी सर्व घटक सहभागी होतात. त्यामुळे लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी युवकांनी पुढे यावे, असे आवाहन देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केले.

    मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाच्या देशपातळीवरील शुभारंभाच्या निमित्ताने भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे ‘मल्टी मीडिया प्रदर्शन’ आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

    निवडणूक उपायुक्त हिरदेश कुमार, निवडणुक आयोगाचे विशेष अधिकारी डॉ.रणबीर सिंग, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, कुलगुरू डॉ. कारभारी काळे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख निवडणुक आयोगाच्या माध्यम व संवाद महासंचालक शेफाली शरण, केंद्रीय संचार ब्युरोच्या अतिरिक्त महासंचालक रंजना देव शर्मा, स्वीप संचालक संतोष अजमेरा आदी उपस्थित होते.

    कार्यक्रमात मतदारजागृतीच्या अनुषंगाने सादर केलेल्या लावणी, जोगवा, जागरण-गोंधळ, कोळीगीत, वासुदेव नृत्य आदी लोककला तसेच गीतांना दाद देताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, लोकगीत, लोकसंगीत, लोकनृत्य, लोककला या आपल्या सर्वांना, समाजाला जोडून ठेवण्याचे काम करतात. आपला देश अनेक समस्यांना तोंड देत असतानाही प्रगतीपथावर वाटचाल करत असल्यामागे या आपल्या सर्वांना बांधून ठेवणाऱ्या शक्ती आहेत. मतदार जागृतीसाठी या कला अतिशय प्रभावी असून त्यांचा जास्तीत जास्त सहभाग घेतला जाईल.

    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ एक नामांकित विद्यापीठ  आहे. त्यामुळे हा कार्यक्रम येथे घेतल्याचे सांगून श्री. राजीव कुमार पुढे म्हणाले, आपला प्रचंड देशात आपण सहभागीतेच्या तत्वावर विश्वास ठेवतो, चर्चा, सहभागाच्या माध्यमातून आपल्या समस्या सोडवण्यावर आपला विश्वास असतो. अनेक गुंतागुंतीच्या, सामाजिक, समस्या, आर्थिक, भौगोलिक समस्या, मानवनिर्मित समस्या अशा सर्व समस्या हळुवारपणे, शांततेत सोडवल्या जातात. त्याच पद्धतीने मतपत्रिकेच्या प्रचंड अशा ताकदीच्या माध्यमातून सत्तेचे हस्तांतरणही अतिशय सुलभतेने होत असते.

    देशात २ लाख ४९ हजार मतदार शंभर पेक्षा अधिक वयाचे, ८० वर्षेपेक्षा अधिक वयोगटातील १ कोटी ८० लाखांपेक्षा मतदार आहेत. पुरुषांइतक्याच महिला मतदारांची संख्या आहे.  लोकशाहीमध्ये दिव्यांग, ज्येष्ठ, महिला, पुरुष, तृतीयपंथी अशा सर्वांचा चांगला सहभाग आहे. त्यामुळे युवकांनीही निवडणूक प्रक्रियेत आपला सहभाग नोंदवावा, असेही ते म्हणाले.

    गावात एक मतदार असला तरी तेथे मतदार नोंदणी केली जाते. एक मत नोंदवून घेण्यासाठी १५-२०  किलोमीटर प्रवास केला जातो. त्यामुळे मताचे मूल्य लक्षात घेतले पाहिजे. आपण समाजमाध्यमावर वेळ घालवू शकतो तर एक मत नोंदवण्यासाठी नक्कीच वेळ देऊ शकतो, असेही श्री. कुमार म्हणाले.

    १८-१९ वयोगटाची लोकसंख्या आणि प्रत्यक्ष झालेली मतदार नोंदणी यामध्ये तफावत आहे. या कार्यक्रमामुळे युवकांच्या लोकशाहीतील सहभागावर चांगला परिणाम होईल असा विश्वास व्यक्त करतानाच तरुणांनी नोंदणी करावी, मित्रांना नोंदणीसाठी प्रोत्साहित करावे तसेच मूल्यांवर आणि मुद्द्यांवर आधारित मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी युवकांना केले.

    युवा मतदार नोंदणी मोहीम लोकचळवळ व्हावी- अनुपचंद्र पांडे

    निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे म्हणाले, कला, साहित्य, गीत, संगीत यामुळे पुणे हे राष्ट्राचे बौद्धिक केंद्राप्रमाणे सांस्कृतिक केंद्रही आहे. त्यामुळे पुणे विद्यापीठातून मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत नवीन मतदार नोंदणीचा देशपातळीवरील शुभांरभ केला जात आहे. कोणीही मतदार नोंदणीपासून राहू नये, मत आपल्या इच्छेने द्यावे मात्र मतदान जरुर करावे आणि निर्भयतेने आणि कोणत्याही प्रलोभनाशिवाय मतदान द्यावे या तीन मुद्द्यावर आयोगाचा भर आहे.

    भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा केवळ १६ टक्के साक्षरता असल्यामुळे येथे लोकशाही रुजेल का ही शंका व्यक्त करण्यात येत होती. परंतु, लोक अशिक्षित असले तरी शहाणे असल्यामुळे ते आपला प्रतिनिधी निवडण्यात चुकणार नाही हा विश्वास होता. आज ५६ टक्के लोक युवा वर्गातील असून मतदार प्रक्रियेत सर्वांनी सहभाग घेतला पाहिजे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुरू झालेली युवा मतदार नोंदणीची मोहीम एक लोकचळवळ (जनआंदोलन) झाली पाहिजे, असेही ते म्हणाले.

    कुलगुरू डॉ. काळे यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनाची संधी विद्यापीठाला मिळाली याबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या सहकार्याने विद्यापीठाने मतदार जागृतीसाठी चर्चासत्रे, कार्यशाळा आयोजित केल्या. तृतीयपंथींयांसाठी कार्यशाळा घेतली. आषाढी वारीमध्ये लोकशाही दिंडीचे आयोजन केले. विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, विद्यापीठातील तसेच संलग्न महाविद्यालयातील निवडणूक साक्षरता मंचाचे सदस्य हे मतदार जागृतीसाठी सक्रीय सहभाग देत असल्याचे त्यांनी सांगितले.

    यावेळी श्रीमती रंजना देव शर्मा यांनी प्रास्ताविकात निवडणूक आयोगाच्या उपक्रमांची प्रसिद्धी, प्रचार करण्यासाठी केंद्रीय संचार ब्युरोतर्फे राबवण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. स्थानिक परंपरा, रिती, कला, लोककला आदींच्या माध्यमातून दुर्गम भागापर्यंत मतदार जागृती करण्यात येत आहे. केवळ माहिती पोहोचवणे आणि मनोरंजन एव्हढाच मर्यादित उद्देश न ठेवता लोकशिक्षण करण्यासाठी ब्युरो प्रयत्नशील असतो असे त्यांनी सांगितले.

    कार्यक्रमामध्ये मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे मतदार जागृतीसाठी राज्यस्तरीय मीम स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मतदारजागृतीच्या अनुषंगाने लावणी, जोगवा, जागरण-गोंधळ, कोळीगीत, वासुदेव नृत्य आदी लोककला तसेच गीतांचे सादरीकरण करण्यात आले. तत्पूर्वी मल्टी मीडिया प्रदर्शनाचे उद्घाटन करुन प्रदर्शनाची पाहणी केली.

    यावेळी निवडणूक आयोगाने राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय तसेच जिल्हा प्रशासनाकडून मतदार नोंदणीसाठी व्यवस्था केलेल्या दालनाला भेट देऊन मतदार नोंदणी प्रक्रियेविषयी अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संवाद साधत माहिती घेतली. यावेळी नुकतीच मतदार नोंदणी केलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थीनी प्रार्थना मोढा हिच्याशी संवाद साधला तसेच सेल्फी पॉईंटवर सेल्फी घेतली. लोकशाही भिंतीवर (डेमोक्रसी वॉल) स्वाक्षरी केली.

    000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed