मुंबई, दि. २ :- ‘स्टोरी टेलचे ‘विकासाचा कल्पवृक्ष’ हे ऑडियो बुक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यातील संवेदनशील माणूस लोकांपर्यत पोहचवेल. त्यादृष्टीने ही ऑडियो बुकची संकल्पना निश्चितच महत्वाची आणि उपयुक्त असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
‘विकासाचा कल्पवृक्ष‘ या पुस्तकाच्या स्टोरीटेलने तयार केलेल्या ऑडियो बुक आवृत्तीचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन झाले. याप्रसंगी वने तथा सांस्कृतिक कार्ये, मत्सव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, स्टोरी टेलचे भारतातील प्रमुख योगेश दशरथ, मराठी विभागाचे प्रमुख प्रशांत मिरासदार आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, ज्यांच्याकडे कर्तृत्व असते, त्यांच्याच कार्याबाबत पुस्तक प्रकाशित होत असतात. मंत्री म्हणून सुधीर मुनगंटीवार यांचे कार्य कर्तृत्व पहात आलो आहे. त्यांनी अनेक जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या आहेत. त्यांची अर्थमंत्री म्हणून काम कऱण्याची पद्धतीही जवळून अनुभवली आहे. वनमंत्री म्हणूनही त्यांनी मोठे काम केले आहे. कोट्यवधी वृक्ष लागवडीचे शिवधनुष्यही पेलले आहे. आता तर त्यांच्याकडे सांस्कृतिक कार्य मंत्रीपदही आहे. म्हणजे त्यांच्याकडे आता वन आणि मन याविषयी काम करण्याची जबाबदारी आहे. त्यांची विधिमंडळ सभागृहातील भाषणे, विषय मांडण्याची हातोटी सर्वांनाच माहित आहे. ते मांडणी करताना अनेक दाखले, आकडेवारी देतात. मंत्रिमंडळ बैठकीतही ते परखडपणे बोलतात. राज्याच्या, लोकांच्या हिताच्या योजना, चांगले निर्णय लोकांपर्यंत पोहचले पाहिजेत, यासाठी त्यांची तळमळ असते. या ऑडियो बुकच्या माध्यमातून त्यांची ही तळमळ, त्यांच्यातील संवेदनशील माणूस लोकांपर्यंत पोहचेल, असा विश्वास आहे.
मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, महाराष्ट्राकडे सांस्कृतिक समृद्धी आहे. ती अशा ऑडियो बुकच्या माध्यमातून जगभर पोहचविता येईल. ऑडियो बुकचे हे माध्यम शक्तीशाली आहे. यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे. आपला महाराष्ट्र धनसंपन्न होईलच. पण तो गुणसंपन्नही होईल. यासाठी या ऑडियो बुक संकल्पनेचा वापर करता येईल.
मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या कार्याविषयीचे ‘विकासाचा कल्पवृक्ष’ हे पुस्तक किरण कुलकर्णी यांनी लिहिले आहे. त्याच्या ऑडियो बुकसाठी कुणाल आळवे यांनी आवाज दिला आहे.
000